पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१२५

रांत नेले. तेथे मोठा समारंभ करून करमणुकीचे अनेक प्रकार चालू केले होते. त्यांत कित्येक सुंदर रमणी नाचत होत्या; व कित्येक गात होत्या. दुधाने कांठोकांठ भरलेला एक पेला राजाने शुकाच्या हाती देऊन, त्यास समारंभाच्या जागेत सात फेऱ्या करावयास सांगितले. त्याप्रमाणे शुकानें सात फेाऱ्या केल्या; परंतु पेल्यांतील दुधाचा एक थेंबहि जमिनीवर पडला नाही. रतीला लाजविणाऱ्या त्या चारुगात्रींच्या दर्शनाने शुकाची वृत्ति यत्किंचिहि चळली नाही. शुक राजापाशी आला तेव्हां राजा त्याला ह्मणाला, “ शुकमुने, तुझ्या वडिलांनी जे तुला सांगितले आहे तेंच पुन्हां बोलून दाखविण्यापलीकडे मला काही सांगावयाचे राहिले नाही. तूं पूर्णच आहेस. तूं सत्यरूप आहेस. तर आतां आपल्या पित्याकडे परत जा."

 अशा रीतीने ज्याने अहंकार समूळ नष्ट केला असेल, आणि ज्याची देहबुद्धि नाश पावली असेल त्याजवर जगांतील कोणतीहि वस्तु सत्ता चालवू शकत नाही. स्वतःच्या इंद्रियांचा जो धनी झाला त्याला गुलाम करावयास या विश्वांत कोण समर्थ आहे ? असा मनुष्य जगांतील अत्यंत पापमय अशा जागेत राहिला तरी तो पुण्यवानच राहणार.

 जगाबद्दल आपणांस सामान्यतः दोन प्रकारची मतें ऐकू येतात. निरावादी लोक ह्मणतात की, 'जग अत्यंत दुष्ट आहे, पापाने भरले आहे, आणि तें कधीहि सुधारावयाचें नाही.' दुसरे कित्येक आशावादी असतात, ते ह्मणतात, 'अहाहा ! हे जग किती सुंदर वस्तूंनी भरलें आहे ! याची भव्यता आणि सौंदर्य पाहून मन आनंदांत गर्क होतें!' ज्यांना स्वतःच्या वृत्तींवर ताबा चालवितां येत नाही, त्यांना हे जग असेंच दु:खमय भासणार; अथवा फार झालें तर, कांहीं थोडें सुखमय आणि बाकी बरेंच दु:खमय असे भासणार. आपण आपल्या वृत्तींचे धनी झालों ह्मणजे जगाचे हे एकेरी स्वरूप नष्ट होऊन जग आहे तसेच उत्तम आहे असे आपणांस दिसूं लागेल. वरवर दिसणाऱ्या सुखाच्या अथवा दु:खाच्या तरंगांनी त्याची एकतानता भंग पावत नाहीं, अगर त्याच्या शांतीस बाध येत नाही, असा आपणांस प्रत्यय येईल. असा प्रत्यय आला ह्मणजे त्यांतील घडणाऱ्या गोष्टींचे आपणांस सुख अथवा दु:खहि वाटणार नाही. हे जग ह्मणजे प्रत्यक्ष नरकवासच आहे असें ह्मणणारा मनुष्य इंद्रियांचा धनी झाला तर तो सुद्धा हे जग ह्मणजे प्रत्यक्ष स्वर्गभूमि आहे असें ह्मणूं लागेल. कर्मयोगाचा मन:पूर्वक अभ्यास करून प्रथम