पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



[३]

एकवटून दिसत होते. या स्वरूपांत जसा कांहीं मनोहर भाग आहे त्याचप्रमाणे कांही विषादोत्पादकभागहि आहे. यच्चयावत् पाश्चात्य देशांतील संस्कृतीतील उत्तमोत्तम तत्वांचा ज्याप्रमाणे अमेरिकेने संग्रह केला आहे त्याचप्रमाणे त्या संस्कृतीतील काही विषादकारक तत्वांचा संग्रहहि तिने केला आहे. विशेषतः शिकागो शहरांत युरोपियन संस्कृतीचे संकलित स्वरूप जितक्या उत्तम रीतीने दिसतें तितक्या रीतीने तें अमेरिकेंत इतर ठिकाणी आढळत नाही. एखादा नवखा मनुष्य प्रथमच शिकागो शहरी आला तर तेथील जनसंमर्द आणि अविरत गडबड पाहून तो गोंधळून जातो. साऱ्या जगांतले बाजारबुणगे जणुं काय एकत्र झाले आहेत असें त्यास वाटते. पण ही उथळ दृष्टि बाजूस ठेवली, तर या प्रचंड घोटाळ्यांतहि अत्यंत अंतवर्ती अशी एकतानता असून एकंदर जगास बंधुभावाचा धडा याच शहराने घालून द्यावा असा परमात्म्याचा स्पष्ट उद्देश दिसतो.

 स्वामी विवेकानंद भाषण करण्यास उभे राहिले तेव्हां त्यांजपुढे असलेला श्रोतृसमूह कोणत्या प्रकारच्या विचारांनी भरलेला असावा याचा अंदाज वरील वर्णनावरून होण्याजोगा आहे. आपल्या धर्माहून उच्च धर्म नाही आणि आपल्या संस्कृतीहून उच्च संस्कृतीहि जगांत दुसऱ्या कोठे नाही ही कल्पना त्यांस एका बाजूस ओढीत असतां कुतूहल त्यांस दुसऱ्या बाजूस ओढीत होते. स्वामीजी आपणांस नवीन असे काय सांगणार तें ऐकण्यास त्यांच्या पुढील श्रोतृगण अत्यंत उत्सुक झालेला दिसत होता. स्वामीजीसमोर अशा प्रकारचा श्रोतृसमूह असतां त्याच वेळी त्यांच्या पाठीमागे अत्यंत शांत व ज्ञानाने तृप्त झालेला असा प्राचीन ऋषिसमूह होता. हा समूह केवळ चैतन्यरूप असल्यामुळे अर्थातच बाह्यनेत्रांस गोचर होत नव्हता. हा चैतन्यसागर अत्यंत प्राचीन आहे; इतका की त्याच्या तुलनेने बौद्धधर्महि परवांचा असें ह्मणतां येईल. या सागरस्वरूप सनातनधर्मात अनेक शाखा आणि पंथ यांचा समावेश झाला आहे. थोडक्यांत इतकेंच सांगावयाचें की स्वामीजींच्या पाठीमागें हजारों वर्षांचा ज्ञानवृद्ध आणि तपोवद्ध असा भारतीय राष्ट्रपुरुष उभा होता.

 अशा रीतीने दोन चैतन्यसागर तेथे एकमेकांस भेदूं पाहत होते. अत्यंत प्राचीन आणि अत्यंत अर्वाचीन संस्कृतींचा संयोग होण्याची ही वेळ होती आणि तें कार्य स्वामीजींच्या हस्ते व्हावयाचे या ईश्वरी संकेताची तेथें पूर्तता होत होती. अशा रीतीने हा संधि होतांच त्यांतून सर्व जगास मान्य अशा नव्या स्वरूपाचा सनातनधर्म तेथें उत्पन्न झाला हे योग्यच झाले. स्वामीजींनी तेथे स्वतःचे असें