पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

अवलंबून राहूं लागते, आणि मी 'स्वतंत्र' आहे, 'परमेश्वरूप' आहे, ही भावना नाहीशी होऊन तुह्मीं आपल्या परमेश्वरस्वरूपापासून लांब जातां.

 आतां याहूनहि परतंत्रतेचे एक अधिक भयंकर स्वरूप आहे. अमुक मनुष्य आपला शत्रु आहे असें निश्चित समजलें ह्मणजे त्याबद्दल सावधगिरी बाळगणे थोडे सोपे होते; पण तोच जर प्रच्छन्न शत्रु असला-मित्रत्वाचें पक्के सोंग घेऊन आला असला, तर त्याचा कावा आपणांस केव्हां गळफांस लावील याचा नेम नाही. तसेच जे दुर्गण ह्मणून उघडपणे दिसतात त्यांचा संपर्क आपणांस होऊ नये अशी खबरदारी घेणे सोपे आहे; परंतु दुर्गुणांनी सद्गुणांचे रूप घेतले ह्मणजे त्यांचा मोह अनिवार असतो. असे समजा, की, आपण श्रीमंत आहों आणि परोपकार करण्याची बुद्धि आपणांस आहे. अशा वेळी अनेक गरीब दुबळे आपला आश्रय करितात. गरीब दुबळ्यांस आश्रय देणे ही गोष्ट वस्तुतः पुण्यकारक आहे. पण तीमुळेच अभिमानाचे वारें हळूहळू आपल्या मनांत शिरूं लागते. 'मी इतक्यांचा पोषक आहे,' 'इतक्या मनुष्यांचें सुखदु:ख मजवर अवलंबून आहे' असले क्षुद्र विचार हळूच आपल्या मनांत शिरून बसतात. सामान्य जनतेकडूनहि असल्या विचारांस प्रोत्साहनच मिळतें. 'अमुक मनुष्य मोठा उदार, दिलदार आणि परोपकारी आहे ' असा प्रवाद आपल्या कानी येऊ लागला की आपला अहंकार-अभिमान-बळावू लागतो, आणि सद्गुणाचे स्वरूप हळू हळू पालटावयास लागून शेवटी त्याचे दुर्गुणांत पूर्ण रूपांतर होते. वास्तविक विचार केला तर सर्व मनुष्ये परमेश्वरस्वरूप असल्यामुळे त्यांना स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्या कोणाच्या तोंडाकडे पाहण्याचा प्रसंग यावा ही आनंदाची गोष्ट आहे काय ? आपणांवर अवलंबून राहणारांची ही स्थिति खचित आनंददायक नाही. असें असतां त्यांच्या दु:खांत आपण आनंद मानणे हे खचित पाप होय. त्यांच्या स्थितीबद्दल आपणांस वास्तविक वाईट वाटले पाहिजे. दुसरा विचार असा की आपण जन्मासहि आलों नसतो तर त्यांचे काही अडून राहिले असते काय ? आपणावर कोणाचेंहि सुखदुःख अवलंबून नाही. जो तो आपापल्या कर्मानुसार सुखदुःख भोगीत असतो, हे तत्व आपल्या हृदयांत पूर्णपणे बाणवून ठेवले पाहिजे. सर्वांचा पोषक, सर्वांचा साहाय्यकर्ता निराळाच आहे. त्याच्याच योजनेप्रमाणे कांहीं मनुष्यांस तो आपणाकडे पाठवितो. त्यांस आपण आपल्या पदरची एक काडीहि देत नसून त्यांचेच त्यांस आपण परत देत असतो . आम्हासारखे कोट्यवधि कर्ण जन्मासहि आले नाहीत तरी जगांतील दुःखांत रतिभरहि भर पडा