पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

वयाची नाही. यासाठी नित्य लक्ष्यांत बाळगण्यासारखी गोष्ट ही की, परोपकाराचा हा हक्क परमेश्वराकडून तुम्हांस कांहीं काल प्राप्त झाला आहे. याचा सदुपयोग तुह्मीं केलात तर दुसरे हक्कहि तुह्मांस प्राप्त होणार आहेत; पण दुरुपयोग केलात तर हा हक्क जाऊन दुसरे मिळावयाचे तेहि मिळणार नाहीत. यासाठी या हक्काचा सदुपयोग करून त्यापासून जें कांहीं शिकावयाचे असेल तें शिकून घेऊन आपल्या ईश्वरत्वाकडे एक पायरी अधिक चढणे हे आपले कर्तव्य आहे. आपणांस ही अनुपम संधि प्राप्त झाली आहे, तिचा आपण योग्य फायदा करून घेतला तर जगांत आपणांस दुःख प्राप्त होण्यास फारसे कारण उरणार नाही. तुम्ही अगदी राज्यावर बसला असलां आणि शेंकडों नोकरांचे धनी असलां, तरी जोपर्यंत वरील तत्व तुम्हीं पक्के लक्ष्यांत बाळगून वागत असाल तोंपर्यंत तुम्हांस दु:ख होईल असें कांहीं करण्याची कोणासहि इच्छा व्हावयाची नाही. तुमचे काही मित्र या वर्षी कालवश झाले असतील, त्यांच्यासाठी जग वाट पाहत बसले आहे काय ? त्याच्या सतत चालू असणाऱ्या प्रवाहांत कोठे लहानसा तरी बांध पडला आहे काय ? नाही. तो अगदी पूर्वीप्रमाणेच चालू आहे. यासाठी जगाकरितां ह्मणून आपणांस कांहीं करावयाचे आहे ही भावना टाकून द्या. जगाला मदत करण्यासाठी आपला जन्म झाला असे वाटणे हा निर्भेळ मूर्खपणा आहे. हा दुरभिमान सद्गुणाचे सोंग घेऊन आलेला आहे हे पुष्कळ वेळां आपल्या लक्ष्यांत येत नाही. कर्मापासून जी दुःखप्राप्ति होते तिचे कारण दुरभिमान हेच आहे. कोणाचेंहि कोणावांचून अडत नाही, हा सिद्धांत आपण एक वेळ पक्का हृदयांत बाळगिला ह्मणजे अभिमानयुक्त कर्माचें फल जे दुःख तें आपणास मिळण्याचे कारण उरत नाही. आपण कोणास काही दिले व त्याजबद्दल कृतज्ञतेच्या एखाद्या शब्दाचीहि अपेक्षा केली नाही तर अशा मनुष्याच्या कृतघ्नपणाने आपणांस वाईट वाटण्याचे कारणच उरत नाही. जिची आपणास अपेक्षाच नव्हती अशी वस्तु मिळाली नाही तर त्याचे दुःख काय आहे ? यासाठी कोणास कसल्याही प्रकारची मदत करतांना केवळ कर्तव्यबुद्धि जागृत ठेवावी. त्याला साहाय्य करण्याचे काम परमेश्वराने आपणाकडे सोपविलें आहे, आणि परमेश्वर दाता असून आपण केवळ साधन आहों असा आपल्या बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. आपणाकडून दुसऱ्यास जें कांहीं प्राप्त होतें तें वास्तविक त्याच्या कर्माचे फल असते. आपल्या कर्मामुळे साधनीभूत होणे, हे आपल्याकडे येते. अशी वस्तुस्थिति असतां मी देणारा