पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

बकरी वगैरे जनावरें आमच्या खाण्याच्या उपयोगी पडावी ह्मणूनच परमेश्वराने निर्मिलीं आहेत ! हा सर्व मूर्खपणाचा बाजार आहे. उद्या एखादा वाघहि असेंच ह्मणूं लागेल की परमेश्वराने सर्व मनुष्ये माझ्या पोटासाठी निर्माण केली आहेत. तोहि उद्यां प्रार्थना करूं लागेल की ‘परमेश्वरा, ही मनुष्ये मजपुढे येऊन उभी राहत नाहीत तर ती केवढी पापी आहेत ! ती तुझा कायदा मोडीत आहेत !' जर जग आमच्यासाठी निर्माण झाले असेल तर आमींहि जगासाठी निर्माण झालों नाही काय ? सर्व जग माझ्यासाठी निर्माण झाले आहे, ही घातुक कल्पनाच आमच्या साऱ्या अवनतीच्या मुळाशी आहे. कोट्यवधि मनुष्ये या जगांतून दरवर्षी नाहीशी होतात आणि कोट्यवधि जन्मास येतात. जगाचें हें रहाटगाडगें अनंतकाल चालू आहे आणि अनंतकाल चालू राहणार.

 यासाठी सशास्त्र कर्म करावयाचे झटले तर अगोदर आशेचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर मी करतो, मी भोगतों, असल्या भावनांचा त्याग केला पाहिजे. या भावनांमुळेच तुह्मीं आणि कर्म ही इतकी एकजीव होऊन बसतां की युगानुयुगें तुह्मीं कर्म करीत राहिलां तरी ही जोडी फुटणे अशक्य होतें. यासाठी कर्म करीत असतां तुह्मीं केवळ साक्षित्व स्वीकारिलें पाहिजे. अलिप्तपणे प्रत्येक कर्म करावयाचे, ह्मणजे त्यांतील यशाने हुरळीवयाचें नाहीं अथवा अपयशानें म्लान व्हावयाचे नाही. अशा बुद्धीने तुह्मीं कर्म करूं लागलां ह्मणजे साक्षित्व याचा बरोबर अर्थ तुह्मांस कळू लागेल. माझे सद्गुरु ह्मणत असत की, 'आपल्या मुलांबाळांकडे तुह्मीं दाईच्या दृष्टीने पहा.' दाईजवळ दुसऱ्या कोणाचें मूल असले तरी ती त्याच्याशी इतक्या लडिवाळपणे बोलेल, खेळेल आणि त्याचे लाड करील की जणू काय ते तिचेंच मूल आहे ! परंतु घरधन्याने तिला नोकरीतून कमी केले की त्याचक्षणी आपले लुगडे चोळी कांखोटीस मारून ती तडक घराबाहेर चालती होईल. घराकडे ती परतून बघणारहि नाही. मुलावरचे तिचे प्रेम एका क्षणांत लयास जाते. तुमच्या मुलांस सोडून दुसऱ्याच्या मुलांस घेण्यासाठी तिचे हात त्याचक्षणी तयार असतात ! अशाच रीतीने तुह्मी या जगांत सदोदित राहिले पाहिजे. जी कांहीं चीजवस्त तुमच्यापाशी आहे ती वास्तविक परमेश्वराची. त्याने ती काही वेळ संरक्षणार्थ तुमच्या स्वाधीन केली आहे, असेंच तुह्मीं सदोदित समजले पाहिजे. अमुक चीजवस्त 'माझी' असें तुह्मीं ह्मणूं लागला की त्याचक्षणी मोह तुह्मांस पछाडतो व दुर्बळ करितो. तुमचें सुखदुःख त्या वस्तूच्या असण्यानसण्यावर