पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

११९

अशी तोड त्यांनी काढिली. जणूं काय आपण मरून जाणे हीच जन्माची इतिकर्तव्यता आहे ! आपण जगावयाचे म्हटले तर प्रत्यक्ष अथवा परंपरेनें कोणा तरी प्राण्याची हत्या आपणांस करावी लागणारच. त्या अर्थी आपला देह नाहीसा करावा ह्मणजे सर्व पापांचें मूळच नाहीसे होईल असा त्यांचा समज असावा, असे वाटते. जैनधर्माचें हेच साध्य ह्मणून सांगितले आहे. वरवर विचार करणारास ही विचारपद्धति सुसंगतशी दिसते; परंतु कर्म ह्मणजे काय, कोणत्या कर्माचे काय परिणाम होतात आणि ते कोणावर होतात, याचा विचार केला ह्मणजे वरील विचारपद्धतीचा पोरकटपणा तेव्हांच उघड दिसून येतो. याचा उलगडा भगवान् श्रीकृष्णांनी गीतेंत केला आहे, तो असा:-जें जें कर्म तुह्मीं स्वतःच्या इंद्रियसुखलालसेनें कराल तें तें तुह्मांस बद्धक होईल. 'मी-' पणा टाकून व कर्ताकरविता निराळाच आहे असें पक्केपणी समजून जें कर्म तुह्मीं कराल त्याचे बरें अथवा वाईट फळ तुह्मांस भोगावे लागणार नाही. कोणतेंहि कर्म करतांना हेतु प्रथम शोधावा. स्वतःच्या सुखेच्छेच्या प्रेरणेने आपण कर्मास प्रवृत्त होत असलो तर त्याचे परिणाम आपणांस भोगलेच पाहिजेत. आणि तसे नसेल तर ते आपणांस भोगण्याचे कारण नाही. कर्मयोगदृष्टया नुसती कृति गौण असून हेतु प्रधान आहे. स्वसुखेच्छेची प्रेरणा नसतां जर तुह्मीं सर्व विश्वाचा वध केलात अथवा स्वतः मारले गेलांत तरी त्या कृत्याचें कोणतेच बरें अथवा वाईट फळ तुह्मांस भोगण्याचे कारण नाही. अशावेळी त्या बऱ्यावाईट कर्माचे कर्तृत्वच तुमच्याकडे नसते, असा भगवान् श्रीकृष्णांच्या सांगण्याचा सारांश आहे. यासाठी कर्मयोगाचे सांगणे असें आहे की "बाबांनो, संसार सोडून उगीच रानांत जाऊन राहूं नका. जगांत राहून संसार करतां करतां जगाचे जे जे अनुभव येतील ते ते सर्व घ्या. कर्म करणें तें त्यापासून सुख होईल या आशेने करूं नका. त्यापेक्षां कर्म न केलेले बरे. इंद्रियांची तृप्ति ही जीविताची इतिकर्तव्यता नव्हे. ह्मणून प्रथम 'मी'पण विसरा, ह्मणजे 'मी' आणि जग एकच असा अनुभव तुह्मांस येईल. आपल्या इंद्रियांची तृप्ति करण्याकरितां 'जग' निर्माण झाले आहे ही कल्पना जाळून टाका." कांहीं कांहीं लोक आपल्या मुलांबाळांस असें शिकवित असतात की, हे सारे विश्व सूर्य, चंद्र वगैरे-परमेश्वराने मनुष्यांच्या सुखासाठी रचले आहे. जणूं काय परमेश्वराला दुसरा चांगला उद्योगच नव्हता! मित्रांनो, आतां यापुढे मुलांबाळांना असल्या मूर्खपणाच्या गोष्टी शिकवू नका. दुसरे काही लोक असें ह्मणणारे आहेत की