पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

'तुझें' आहे, हा निश्चय त्याच्या अंतःकरणांत पूर्ण बाणून गेलेला असतो. ही पूर्ण संन्यस्तवृत्ति नव्हे तर काय? ज्ञानाची शेवटची पायरीसुद्धा ही संन्यस्तवृत्तीच होय. जग हे काय आहे, मी कोण आणि विश्वचैतन्याचे स्वरूप काय आहे इत्यादिकांचा शोध करतां करतां सर्व जग केवळ मृगजलाभास आहे; दिसतें तसें तें नाहीं; तें प्रत्येक क्षणी बदलत आहे यामुळे तें अनिश्चित स्वरूपाचें आहे-मायानिर्मित आहे-असा त्याचा पक्का निश्चय होतो. जग अनित्य स्वरूपाचे आहे असा निश्चय एकवेळ बाणून गेल्यावर त्यांतील कोणत्या पदार्थांची त्याने इच्छा करावी? अशा रीतीनेच तो पूर्णत्यागी-पूर्ण संन्यस्तवृत्तीचा-बनतो. यावरून कर्म, भक्ति आणि ज्ञान यांचे अंतिमसाध्य-अंतिम पर्यवसान-एकच आहे असे सिद्ध होते. जगांत जे मोठे धर्मप्रवर्तक होऊन गेले, त्यांनी निरनिराळ्या मार्गाने या एकाच तत्वाचा उपदेश केला आहे. 'परमेश्वर जगांत नाहीं असें जें त्यांनी सांगितले त्याचा वास्तविक अर्थ, जगांतील वस्तूंच्या मागे लागून परमेश्वराची प्राप्ति होणार नाही, हाच आहे. जगाचें जें स्वरूप आहे त्याहून परमेश्वराचे स्वरूप अगदी भिन्न आहे असे त्यांनी सांगितले. 'मी' आणि 'माझें ही बहुधा सर्वत्र आढळून येणारी प्रवृत्ति हे जगाचे स्वरूप आहे, आणि या स्वरूपापासून निवृत्त होणे ह्मणजे परमेश्वररूप होण्यासारखे आहे. प्रवृत्ति हे जगाचे स्वरूप आणि निवृत्ति हे परमेश्वराचे स्वरूप आहे. एखादा मनुष्य रत्नजडित सुवर्णाच्या राजवाड्यांत राहत असून आणि सर्व प्रकारचे भोग भोगीत असूनहि जर त्याच्या मनांतून 'मी' आणि 'माझें' यांची आठवण गेली तर त्यालाहि पूर्ण संन्यासी ह्मणतां येईल. तसेंच पर्णकुटीत राहणारा आणि अंगावर फाटक्या लंगोटीवांचून दुसरें वस्त्र नसणारा असा कोणी असून जर जगांतील वस्तूंचा हव्यास त्याच्या मनांतून गेला नसेल तर तो संन्यासी नसून पूर्ण संसारीच म्हटला पाहिजे.

 आपण कोणतेंहि कर्म केले तरी त्यांतून चांगला आणि वाईट असे दोन्ही परिणाम घडून येतात. केवळ चांगले अथवा केवळ वाईट असें एकहि कर्म आपणास करता येत नाही, याचा विचार आपण पूर्वी केलाच आहे. तर मग आह्मीं कर्म तरी कसे करावे हा प्रश्न साहजिक उद्भवतो. या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या भानगडीत पडून जगांतील कित्येक पंथाचे प्रवर्तक बेसुमार वाहावले आहेत. कोणाला तरी दुःख दिल्यावांचून स्वतःस सुखाची प्राप्ति करून घेतां येत नाही, असे पाहून स्वतःच्या गरजा कमी करतां करतां शेवटी मरून जावयाचें