पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

११७

पक्व दशा होय. आपल्या मनाची इतकी तयारी झाली ह्मणजे कर्मयोगाच्या शेवटच्या पायरीस आपण पोहोंचलों असें होतें. सर्व चांगल्या कर्माचें हेंच अत्युच्च फळ आहे. एखाद्याने कोणत्याहि तत्वग्रंथाचा अभ्यास केला नसला, परमेश्वरावर त्याचा मुळीच विश्वास नसला, साऱ्या जन्मांत त्याने प्रार्थनापर असा एकहि शब्द उच्चारला नसला तथापि सत्कर्माने त्याची बुद्धि पूर्ण निवृत्तिपर झाली असली तर अत्यंत धार्मिक असा मनुष्य भक्तीने ज्या ठिकाणी जाईल अथवा मोठा तत्ववेत्ता ज्ञानाने जे ठिकाण हस्तगत करील तें ठिकाण या कर्मयोग्यासहि प्राप्त होईल. यावरून ज्ञानी, कर्मयोगी आणि भक्त हे सर्व शेवटी एकाच ठिकाणी मिळतात, असें तुमच्या लक्ष्यांत येईल. जेथें 'मी' आणि 'माझें' या शब्दांचीहि विस्मृति होते तेच ते ठिकाण. यालाच संन्यस्तवृत्ति असेंहि ह्मणतात. कोणत्याहि धर्माचा, पंथाचा अथवा तत्वविचाराचा कोणी मनुष्य असला तरी खऱ्या “संन्यस्तवृत्तीच्या मनुष्याबद्दल त्याच्या मनांत अत्यंत आदरबुद्धि उत्पन्न झाल्यावांचून राहणार नाही. परक्याकरतां आपलें सर्वस्व व प्रसंगी जीवहि दान करण्याची ज्याची खरी तयारी आहे अशा मनुष्याबद्दल कोणाच्याहि मनांत अत्यंत पूज्यबुद्धि उत्पन्न झालीच पाहिजे. या ठिकाणी पंथाचा, मताचा अथवा अर्माचा प्रश्नच उद्भवत नाही. अगदी विरुद्ध मतांच्या धर्माचा अथवा पंथाचा कोणी असला तरी अशा मनुष्याबद्दल त्याला नकळतहि त्याच्या मनांत पूज्यवुद्धि उत्पन्न होते. एडविन आर्नोल्ड यांनी 'आशियाखंडाचा दीप' ( Light of Asia ) या नांवाने एक बुद्धाचें चरित्र लिहिले आहे; तें वाचून एखाद्या आग्रही ख्रिस्त्याच्या मनांतहि बुद्धाबद्दल पूज्यभाव उत्पन्न झाल्याचे तुह्मीं पुष्कळवेळां पाहिले असेल. बुद्ध निरीश्वरवादी होता. त्याने भक्तिमार्गाचा कधीहि उपदेश केला नाही. त्याने विशिष्ट असा तत्वमार्गहि शोधून काढिला नाही. त्याने केवळ संन्यस्तवृत्तीचा उपदेश केला. परक्यासाठी आपले सर्वस्व व प्रसंगी आपला जीवहि अर्पण करा, एवढाच त्याचा उपदेश आहे. सर्व धर्माचे, सर्व पंथांचें, सर्व मतांचें आणि सर्व तत्वदर्शनांचे अंतिम साध्य एकच आहे, ही गोष्ट आग्रही मनुष्याच्या लक्ष्यांत आलेली नसते ह्मणूनच तो एका विशिष्ट मताचा अथवा धर्माचा आग्रह धरून बसतो. भक्तिमार्गाची अगदी शेवटली पायरी म्हटली ह्मणजे सर्वत्र परमेश्वराचेंच अधिमान पाहणें ही होय. खऱ्या भक्ताच्या मनांत 'मी' आणि 'माझ' या शब्दांची आठवणहि शिल्लक उरत नाही. कसल्याहि स्थितीत ‘परमेश्वरा, तुझी मर्जी ' असेंच तो ह्मणतो. जगांत 'माझें' कांही नाही. जे काही आहे तें