पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

अशी शंभर मनुष्ये निर्माण झाली तर अशा राष्ट्रास अवनतीची भीति नको. परंतु मनुष्यजातीचे बलवत्तर दुर्दैव ह्मणून अशी मनुष्ये फारच क्वचित् आढळतात. यानंतर दुसऱ्या प्रतीचे लोक ह्मटले म्हणजे स्वतःला उपाधि न होतां, पडवेल तितकें लोकांच्या उपयोगी पडावयाचे अशी इच्छा बाळगणारे हे होत. आणि तिसऱ्या प्रतीचे म्हटले तर केवळ आपल्याच सुखाकरितां जगणारे लोक होत. प्रसंगी परक्याचा जीव गेला तरी हरकत नाही, पण हे आपल्या सुखांत कमी पडू देणार नाहीत. यानंतर आणखी चवथा प्रकार एका संस्कृत कवीनें सांगितला आहे; व त्यांस त्याने निनांवी कोटीत ढकलले आहे. ह्मणजे त्यांस नांव काय द्यावे याची कल्पना कवीस झाली नाही. हे लोक केवळ मौजेखातर इतरांस पीडा करितील. लोकांना त्रास दिला ह्मणजे यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली! पृथ्वीस जसे परस्परविरुद्ध असे दोन ध्रुव आहेत तसेच मानवसमाजालाहि दोन ध्रुव आहेत. स्वतः जिवाची पर्वा न करितां परक्याचे बरे करावयाचे हा एक ध्रुव, आणि स्वतःच्या जिवाची पर्वा न करितां परक्याचे अनिष्ट करावयाचे हा दुसरा ध्रुव. परक्याचे इष्ट करावयाचे हा जसा पहिल्याचा स्वभाव, तसाच परक्याचे अनिष्ट करावयाचे हा दुसऱ्याचा स्वभाव.

 प्रवृत्ति आणि निवृत्ति असे दोन शब्द संस्कृत भाषेत नेहमी आढळतात. प्रवृत्ति ह्मणजे आंत घेणे आणि निवृत्ति ह्मणजे बाहेर टाकणे. आंत घेणे ह्मणजे सदोदित 'मी' आणि 'माझें हाच विचार करणे. ज्या ज्या कारणांनी 'मी' आणि 'माझें' या विचारास पुष्टि मिळते ती सर्व कारणे प्रवृत्तिपर होत. यांत द्रव्य, सामर्थ्य आणि कीर्ति इत्यादिकांचा अंतर्भाव होतो. यांचा पगडा चित्तावर बसला ह्मणजे जगांतील सर्व संपत्ति, सर्व सत्ता आणि सर्व कीर्ति ही या एका 'मी'त सांठून राहावी अशी इच्छा उद्भवते. जगांतील सर्व संपत्ति इत्यादिकांचे केंद्रस्थान या 'मी'त येऊन राहते. यालाच प्रवृत्ति असें ह्मणतात. जगांतील सर्व सामान्य मनुष्यांची बुद्धि प्रवृत्तीकडे वळलेली असते; ही बुद्धि मावळू लागली ह्मणजे निवृत्तीचा उदय होऊ लागतो. व तिच्या उदयाबरोबर नीति आणि धर्म यांच्या कल्पनांचा उदय होऊ लागतो. प्रवृत्ति आणि निवृत्ति हे दोन्ही कर्माचे परिणाम आहेत. सहेतुक कर्माचा परिणाम प्रवृत्ति आणि अहेतुक कर्माचा परिणाम निवृत्ति. जगांतील सर्व धर्माचा आणि नीतिशास्त्रांचा पाया पटला ह्मणजे निवृत्ति हाच होय. 'माझें' आणि 'मी' हे शब्दहि विसरून जाणे, आणि परक्याकरिता प्रसंगी जीव देण्यासहि न कचरणे ही निवृत्तीची परि