पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

११५

व आपलपोटेपणा-अहंकार-विसरल्यावांचून तिची प्राप्ति होत नाही, असें ज्ञान आपणांस होते. परोपकारार्थ केलेले प्रत्येक कर्म, सहानुभूतीचा प्रत्येक विचार आणि प्रत्येक सत्कर्म आपणांतील अहंकार कमी करण्यास कारणीभूत होतें. आपणांतील अहंकार जसजसा कमी होत जाईल, तसेतसे आपले स्वतःचें क्षुद्रत्व अधिक ढळढळीतपणे आपणांस दिसू लागते. परोपकाराचा हा खरा उपयोग आहे. ज्ञान, भक्ति, आणि कर्म यांनी दाखविलेले निरनिराळे मार्ग एकत्र होण्याचा हाच मध्यबिंदु आहे. अहंकार संपूर्णपणे विसरून गेला ह्मणजे 'मी'. पण नष्ट होते व त्याजागी 'तूं'पण येते. सर्व प्रकारची द्वंद्वे नष्ट झाली, दृश्य जग नाहीसे झाले आणि शेवटी जे काही उरलें तें 'मी' नसून 'तूं' उरलें आहे. जिकडे पाहावे तिकडे 'मी' नसून 'तूं' दिसते आणि अंतर्यामीहि 'मी' नसून 'तूं' उरतें. कर्मयोगाच्या आचाराचे शेवटी हेच पर्यवसान व्हावयाचे. कर्मयोगाचा आचार तुह्मीं समजून करा अथवा न समजतां करा पण तुमचे आचरण जर कर्मयोगाच्या तत्वांस अनुसरून होत असेल तर त्याचा निश्चित परिणाम हाच व्हावयाचा. अशा रीतीने निराकार परमरूपाशी ऐक्य होणे हेच सर्व योगांचे साध्य आहे. धर्मोपदेश हा ज्याने पोटाचा धंदा केला आहे, अशा उपदेशकाला निराकार परमेश्वर आणि त्याशी ऐक्य ही कल्पनाच भयंकर वाटेल. परमेश्वर साकार असून भक्त हा त्यापासून नेहमी निराळाच राहणार असें तो ह्मणेल. आपण बोलतों त्याचा वास्तविक अर्थहि त्याला कळणार नाही; पण असें ह्मणणे हेच त्याच्या फायद्याचे आहे. त्याच्या नीतिविषयक कल्पना कितीहि उच्च दर्जाच्या असल्या तरी 'मी'पण विसरण्याइतकी त्याची जल कधीहि जाणार नाही. वास्तविक विचार केला तर 'मी'पण विसरणे हाच सर्व नीतिसिद्धांतांचा पाया आहे. 'मी'पण संपूर्ण विसरल्याशिवाय खरी भक्ति करणे-खरें प्रेम करणें-हेंहि शक्य नाही. मग हे प्रेम मनुष्यांविषयी असो, पशुपक्ष्यांविषयी असो, देवदूतांविषयी असो, अथवा आत्म्याविषयी असो. सर्व नीतिसिद्धांतांच्या पोटी हेच तत्व ग्रथित असल्याचे आपणांस आढळेल.

 या जगांत आपणांस अनेक प्रकारचे लोक आढळून येतात. कित्येक पूर्ण संन्यासी असतात. आयुष्य संपेपर्यंत केवळ लोकांच्या बऱ्याकरितां हे कर्मे करितात. कोणाचे कल्याण यांच्या प्राणनाशाने होत असले तर तोहि करावयास ते मागे पुढे पाहणार नाहीत. यांना स्वतःच्या देहाविषयी ममता यत्किंचितह आढळणार नाही. सर्वांत ही अत्युच्च कोटीची मनुष्ये होत. एखाद्या राष्ट्रांत जर