पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

कोणाना कोणास तरी तें दुःखप्रद होणारच. मग सर्व जग सुखी होईल ही कल्पना ह्मणजे वंध्यासुताची काहाणी नव्हे तर काय ? प्रत्येक क्षणी आपल्या सुखासाठी आपण कोणाना कोणाबरोबर तरी लढत असतोच. आपला जय झाला तर आपल्या कल्पनेप्रमाणे काही सुखप्राप्ति झाल्यासारखें होतें. पराभव झाला तर, एक तर जीवित नष्ट होणार अथवा पुन्हां दुसऱ्या लढाईस सुरवात होणार! आपल्या जीवितास अत्यंत आवश्यक असें अन्न आणि हवा ही सुद्धा लढाई केल्यावांचून आपणांस प्राप्त होत नाहीत. यांपैकी कोणतेंहि एक आपणास प्राप्त झाले नाही तर आपले जीवित संपलेंच. जीवित हे कोणत्याहि एकाच वस्तूमुळे झालेले नसून अनेक वस्तूंच्या समीकरणाचा तो परिणाम आहे. हा देहांतर्गत वस्तुसमुच्चय एकीकडे आणि बाह्य जग दुसरीकडे असून यांजमधील युद्धास जीवित अशी संज्ञा आहे. या युद्धाचा शेवट आणि जीविताचा शेवट ही दोन्ही बरोबरच घडतात. यावरून सुखमय अथवा पूर्ण जगाची कल्पना ह्मणजे केवळ मृगजलाभास आहे.

 तर मग चिरंतन सुखमय स्थिति शक्यच नाही असें तुमचें ह्मणणे आहे काय? नाही. असे आमचे ह्मणणे नाही. ज्या वेळी सुख आणि दु:ख, पाप आणि पुण्य इत्यादि द्वंद्वे पूर्णपणे नाहीशी होतील त्यावेळी सुखमय स्थिति तुह्मांस प्राप्त होईल. पण अशी स्थिति प्राप्त होण्याबरोबर चालू जीवनक्रमाचा मात्र अंत होईल. चालू जीवनक्रमाचा अंत झाल्याशिवाय-द्वंद्वे बंद झाल्याशिवाय-सुखमय स्थितीची प्राप्ति नाही; अशी ही परंपरा आहे. आपण परोपकारार्थ ह्मणून जी कर्मे करितों ती वस्तुतः स्वतःसच उपकारक होतात, हे आपण पूर्वी सिद्ध केलेच आहे. जी जी कर्मे आपण परोपकारार्थ ह्मणून करितो त्या सर्वाचा संकलित परिणाम टला तर आत्मशुद्धि हा होय. परोपकाराची इच्छा जो जों बळावत जाते तो तों आपला अहंकार मावळत जातो. परहिताचे चिंतन आपण करूं लागलों ह्मणजे स्वसुखलालसा आपोआपच कमी होऊ लागते. स्वसुखलालसा कमी होऊ लागली, ह्मणजे आपणांस अत्यंत चिकटून राहिलेल्या देहाध्यासाची मिठी सुटू लागते. जी आपणांस आपल्या जीवनक्रमांत अत्यंत महत्वाची अशी जी काही गोष्ट शिकावयाची आहे ती अहंकारविस्मृति ही होय. जगाबरोबर एकसारखें युद्ध करून मी स्वतःस सुखी करीन, असा जो आपला समज आरंभी असतो तो मूर्खपणाचा आहे असा प्रत्यक्ष अनुभव आपणांस येऊ लागतो. सुख हे बाहेरून कोठून मिळविण्याजोगी चीज नसून ती आपल्यापाशीच आहे