पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

असोत; पण आपल्या जगण्यामुळे त्यांस उपसर्ग पोहोचतो व प्रसंगी त्यांचा प्राणनाशहि होतो ही गोष्ट खरी. यावरून सिद्धांत असा निघतो की केवळ कर्म करून पूर्णत्वास पोहोचणे आपणांस शक्य नाही. विश्वाच्या अंतापर्यंत आपण कर्मच करीत राहिलों तर या चक्रव्यूहांतून सुटण्यास आपणांस मार्ग नाही. कोणतेंहि आणि कितीहि कर्म केले तरी त्यांतून सुख आणि दुःख ह्मणजे अनुक्रमें पुण्य आणि पाप यांची उत्पत्ति टाळतां येण्यास मार्ग नाही.

 आतां या पुढे दुसरा प्रश्न असा उद्भवतो की आपल्या ह्या साऱ्या कर्माचें पर्यवसान तरी कोठे होणार ? युगानुयुगें एकसारखें कर्म करून आह्मीं साधणार तरी काय ? कित्येक असें ह्मणतात की, पुढे केव्हां तरी हे जग पूर्णत्वास पोहोचणार आहे. ह्मणजे या जगांत दु:ख, दुष्टपणा, रोग, मृत्यु इत्यादिकांचे जें पूर्ण साम्राज्य आपणांस दिसत आहे तें नाहींसें होऊन सर्व सृष्टि सुखाने नांदत असण्याचा काळ पुढे येईल. असें उत्तर देणारे शेकडों लोक तुह्मांस प्रत्येक देशांत आढळतील. ही कल्पना मोठी सुखकर आहे खरी; अज्ञजनांस चांगल्या कर्मास उत्तेजित करण्यास आणि दु:खप्रसंगी आधार ह्मणून या कल्पनेचा उपयोग करितां येईल हेहि खरे; परंतु ती केव्हां तरी सत्यत्वास येणे शक्य आहे काय, एवढाच काय तो विचाराचा प्रश्न आहे. क्षणभर विचार केला तर जग अशा स्थितीस येईल ही कल्पना निव्वळ अशक्य कोटीपैकी आहे, असे आपणांस आढळून येईल. अगदी वरवर विचार करणारासहि या कल्पनेची अशक्यता दिसून येण्याजोगी आहे. एका धातूच्या तुकड्यावर दोन बाजूस दोन शिक्के मारिले झणजे त्यास नाणे अशी संज्ञा प्राप्त होते. हे शिक्के निघून गेले ह्मणजे त्याबरोबर त्या तुकड्याचे नाणेपणहि नष्ट झाले नाही काय? तसेच जगाची उत्पत्ति आणि स्थिति ही जर सुख आणि दु:ख या द्वंद्वाच्या अस्तित्वावरच अवलंबून आहेत तर यांपैकी कोणतेंहि एक नष्ट झाले की जगाचेंहि अस्तित्व संपलेंच. सुख आणि दु:ख या दोन्ही कल्पना सापेक्ष आहेत. यांपैकी कोणत्याहि एकीमुळेच दुसरीचा अनुभव होतो. यांतील कोणतीहि एक नष्ट झाली तर दुसरीचें अस्तित्व संपुष्टांत आलेच ह्मणून समजावें. केवळ सुखोत्पादक असे एकहि कर्म करता येणे शक्यच नाही, हे नुक्तेंच आपण पाहिले. तर मग पूर्णत्व या शब्दाचा अर्थ काय ? पूर्ण जीविताची कल्पना ह्मणजे वंध्यासुताची काहाणी आहे. आपले सर्व जीवित केवळ चढाओढीवर अवलंबून आहे. सुखाची इच्छा उद्भवली की, तदनुरूप आपण कर्म करूं लागतो. आपण कर्म करूं लागलों ह्मणजेस्वा. वि. ८