पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

असे सांगतां येणें आपणांस अशक्य आहे. ज्याचे चांगले आणि वाईट परिणाम एकाच वेळी होत नाहीत असे कोणतेंहि कर्म करता येणे शक्य नाही. याचे प्रत्यंतर पहावयास फार लांब जावयास नको. मी या क्षणी आपणाशी बोलत आहे. माझं हे कृत्य चांगले आहे असें तुह्मांपैकी काहींस वाटत असेल, पण याच वेळी माझ्या भाषणाच्या आघाताने हवेतील हजारों सूक्ष्म जंतु मृत्यु पावत असतील. ह्मणजे माझ्या एकाच कर्मापासून चांगला आणि वाईट असे परस्पर विरुद्ध परिणाम एकाच वेळी घडत आहेत. एखाद्या कृत्याचे परिणाम प्रत्यक्ष आपल्या नजरेसमोर होत असले आणि त्यामुळे आपल्या ओळखीच्यांपैकी कोणाचे बरे होत असले तर तें कर्म सत्कर्म आहे असे आपण ह्मणतों. माझे भाषण हे सत्कर्म आहे असें तुह्मी ह्मणाल पण माझ्या आवाजाने मृत्युमुखी जाणारे हजारों कीटक काय ह्मणत असतील बरें ! तुह्मी आपणा स्वतःस पाहत आहां आणि माझ्या भाषणाने तुमच्या चित्तावर काय परिणाम होतो याचा स्वतः अनुभव घेत आहां. परंतु सूक्ष्म कीटक तुह्मांस दिसत नाहीत आणि त्यांजवर होणारा परिणामहि तुमच्या दृष्टिपथाबाहेरचा आहे; यामुळे माझ्या कृतीचा एकच परिणाम पाहून तुह्मी त्याला सत्कर्म असें नांव देतां. अशाच रीतीने एखाद्या दुष्कृत्याचे सूक्ष्म अवलोकन केले तर त्यांतूनहि कदाचित् एखादा चांगला परिणाम कोठे तरी घडत असल्याचे आढळून येईल. स्थूल दृष्टीने चांगल्या दिसणाऱ्या कर्माचे वाईट परिणाम पाहण्याइतकी सूक्ष्म दृष्टि ज्याला आहे आणि वाईट कर्मांतूनहि उद्भवणारे चांगले परिणाम जो पाहूं शकतो त्यानेच कर्मयोगाचे रहस्य खरोखर जाणले असे समजावें. 'कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥' अशी बुद्धिमानाची व्याख्या गीतेत सांगितली आहे. असो.

 यावरून एवढेच लक्ष्यांत ठेवावयाचें की परक्याच्या सुखदु:खानुरोधे आपल्या कर्माचा विचार केला तर केवळ सुखोत्पादक अथवा केवळ दु:खोत्पादक असे कोणतेंहि कर्म आपणांस करता येणे शक्य नाही. दुसऱ्या कोणा तरी जीवास दुःख दिल्याशिवाय आपणांस जगणे अथवा श्वासोच्छास करणेहि शक्य ना. अन्नाचा एक घांस आपण भक्षण करणे ह्मणजे तेवढे अन्न दुसऱ्या कोणाच्या तरी तोंडून बाहेर काढण्यासारखेच आहे. आह्मीं स्वतः जगणे ह्मणजे पृथ्वीची जागा अडवून दुसऱ्या कोणास तरी जगण्याचा अवसर न देणे असेच होते. आपल्यामुळे ज्यांस दु:ख होते ते मनुष्य असोत, पशुपक्षी असोत, अथवा अत्यंत सूक्ष्म जंतु