पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करावी असे एखाद्याच्या मनांत आले ह्मणजे त्याचे मन काही विशिष्ट प्रकारच्या स्थितीला प्राप्त झालेले असते व त्या स्थितीत त्यावेळी स्वतःशी सदृश अशा वातावरणांतील दुष्ट विचारतरंगांचें तें ग्रहण करिते. यामुळे दुष्ट मनुष्य नेहमींच दुष्कत्ये करतांनां आपणांस आढळतो. दुष्कृत्ये करण्याची त्याची मनःप्रवृत्ति दिवसेंदिवस वाढतच जाते. यासाठी दुष्कृत्ये करण्याचा विचार आपल्या मनांत येतो त्या वेळी एक दोनधारी शस्त्रच आपण तयार करीत असल्यासारखें होतें. एक तर, अशा वेळी बाहेरील दुष्ट तरंगांस आपल्या मनांत घुसावयास दरवाजा उघडून दिल्यासारखें होतें; आणि दुसरें असें की आपल्या मनांतून बाहेर पडणारे दुष्ट तरंग दुसऱ्या कोणास तरी अधिक दुष्ट करण्यास कारणीभूत होण्याचा संभव असतो. हा दुसरा परिणाम होण्यास कदाचित् कित्येक वर्षांचा काळ लोटावा लागेल. पण तसा परिणाम केव्हां ना केव्हां तरी होईल हे निश्चित आहे. याकरितां आपण जेव्हा एखादें दुष्कृत्य करितो, त्यावेळी आपलें नाक कापून दुसऱ्यास अपशकून केल्यासारखे होते. तसेंच आपण शुभ कर्म केले तर ते आपणांस जसें कल्याणप्रद होते तसेच त्याचा इतरांवरहि इष्ट परिणाम घडतो. मनुष्यांत ज्या कांही शक्ती गुप्तपणे वास करीत आहेत. त्या स्वतःशी सदृश असे तरंग बाहेरून गोळा करितात आणि स्वतः अधिक सामर्थ्यवान् होऊन प्रगट होतात. देवीसंपद्विमोक्षाय निबंधायासुरी मता हा भगवद्गीतेचा सिद्धांत प्रत्येकाने नीट लक्षांत बाळगावा.

 कोणतेंहि कर्म एक वेळ कर्त्यांच्या हातून घडलें ह्मणजे तें फळाला पोहोचेपर्यंत मध्यंतरी त्याचा नाश होऊ शकतच नाही; असा कर्मयोगाचा सिद्धांत आहे. तें फलद्रप होण्याच्या आधी त्याचा नाश करण्यास समर्थ अशी एकहि शक्ति विश्वांत जन्मास आली नाही. जर मी कांहीं दुष्कृत्य केले तर त्यापासून उत्पन्न होणारे दुष्ट फळ मलाच भक्षण केले पाहिजे. माझें दुष्कृत्य फलद्रूप होऊ न देणे हे जसें अशक्य आहे तसेच तें कटु फळ माझ्या तोंडी न पडेसें करणें हेहि अशक्यच आहे. तसेंच मी काही चांगले कर्म केले तर त्याचे शुभ फळ प्राप्त न होण हेहि अशक्य आहे. कारण उत्पन्न झाले की त्याचे कार्य हे घडलेच पाहिजे. यांत कमीअधिक करण्याचे कोणास सामर्थ्य नाही. आतां येथे एक अत्यंत सूक्ष्म विचाराचा प्रश्न उद्भवतो. आपण कोणतेंहि कर्म केले तरी त्यांत चांगला व वाईट अशा दोन्ही परिणामांची अत्यंत संलग्न अशी स्थिति आढळते. कोणत्याही एका कर्माचे चांगलेच परिणाम होतात व वाईट कांहींच होत नाहीत