पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[२]

आहे ते इतर देशांतील लोकांस सांगून त्यांसहि सुखाचा मार्ग खुला करून द्यावयाचा हे आर्यभूमीचे ब्रीदच आहे.

 जगांतील इतर देश अज्ञाननिद्रेत घोरत पडले असतां भगवान् बुद्धाने आपल्या शिष्यांच्याद्वारे त्यांस जागृति आणिली. आपले ज्ञान, इतरांस दिल्याने दुणावतें, ही गोष्ट आर्यभूमीच्या लक्ष्यांत आल्यास पुष्कळ काळ लोटून गेला आहे. आपल्या ज्ञानाचा देशोदेशी प्रसार केल्यामुळे हिंदुधर्मास अभेद्यरूप प्राप्त झाले आहे. पाश्चात्य देशांतील एका व्याख्यानांत स्वामी विवेकानंद ह्मणाले 'जर एक धर्म खरा असेल तर इतर धर्महि खरे असलेच पाहिजेत. सर्व धर्माचें साध्य एकच असल्यामुळे सर्व जग वस्तुतः एकधर्मीच आहे. याकरितां हिंदुधर्म जितका माझा ह्मणतां येईल तितकाच तो तुह्मां सर्वांचाहि आहे.' आपले शिष्य इतर देशांत पाठविण्यांत भगवान् बुद्धाच्या मनांत एकंदर मानवजातीबद्दल जे प्रेम वसत होते, त्याचीच पुनरावृत्ति स्वामीजींच्या या उद्गारांत आपणांस आढळून येते. दुसऱ्या एका व्याख्यानांत स्वामीजी ह्मणतात 'आह्मी हिंदुलोक इतर धर्माशी विरोध तर करीत नाहींच; पण नुसते उदासीनहि न राहतां त्यांच्या मूलतत्वांशी एकजीव जाऊन राहतो. धर्म ह्मटला की तो महंमदाने सांगितलेला असो, जरदुष्ट्राने सांगितलेला असो अथवा येशु ख्रिस्ताने सांगितलेला असो; त्यांतील सार ग्रहण करण्यास आह्मी नेहमी तयार असतो. अगदी रानटी देशांतल्या धर्मापासून तो अत्युच्च धर्मापर्यंत सर्व धर्म, हे परमेश्वरप्राप्तीचे-अनंताशी एकरूप होण्याचे मार्ग आहेत, ही गोष्ट आजपर्यंत आमच्या लक्ष्यांतून कधींहि गेली नाही. याकरितां सर्व धर्मरूप पुष्पं प्रेमसूत्राने एकत्र करून अनंताच्या चरणी अर्पण करणे हाच आमचा पूजाविधि आहे.' अमुक मनुष्य परका अथवा परदेशचा असा भाव स्वामीजींच्या चित्तास कधी शिवलाहि नाही. एकंदर मनुष्यजातीबद्दल त्यांच्या चित्तांत आपलेपणा वसत होता. सत्यमार्गाचा उपदेश त्यांनी सर्वाना एकसारखाच केला.

 अमेरिकेतील सर्व धर्माच्या परिषदेपुढे त्यांनी 'हिंदुधर्म कल्पना' या विषयावर व्याख्यान दिले, तेव्हां हिंदुधर्मतत्वांचे सामान्य निरूपण करावयाचे इतकाच त्यांचा उद्देश होता; पण त्यांच्या अमोघ वाणीचा प्रवाह सुरू झाल्याबरोबर सामान्य निरूपणाचे स्वरूप बदलत जाऊन शेवटी हिंदुधर्म आपल्या संपूर्ण तेजानें प्रकाशमान् झाल्याचे आढळून आले ! तो प्रसंगच तसा होता ! मिचिगन सरोवराच्या काठी वसलेल्या त्या शिकागो शहरांत पाश्चात्य संस्कृतीचे स्वरूप जणुं