पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१०९

करूं नये. कारण त्यामुळे नफा कांहींच न होतां नुकसान मात्र हटकून होते. धर्माभिमानाचा आव घालणारे काहीजण असें ह्मणतात की “आह्मीं पाप्यांचे द्वेष्टे नसून पापाचे द्वेष्टे आहों." असे धर्माभिमानी अथवा धर्मवेडे तुमच्याहि पाहण्यांत आले असतील. पापी मनुष्य आणि त्याने केलेले पाप ही स्वतंत्रपणे पाहण्याइतकी ज्याची दृष्टि दिव्य झाली आहे, त्याच्या दर्शनासाठी जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत मी पायाने चालत जाईन. पाप आणि पापी मनुष्य ही भिन्न आहेत असें तोंडाने बडबडणे फार सोपे आहे; परंतु अंतःकरणांत तसा अनुभव येऊन त्याप्रमाणे कृति घडणें दुष्कर आहे. तसेच आपले चित्त सदोदित शांत ठेविलें तर प्रेमाचा उदय आपल्या हृदयांत लवकर होऊन निष्काम कर्म आपल्या हातून होऊं लागेल.

प्रकरण ६ वें.
अनासक्ति हाच अहंकारनाश.

ज्याप्रमाणे आपल्या कृतीचे परिणाम फळरूपाने आपणांकडे येतात त्याच प्रमाणे आपल्या कृतीचे परिणाम परक्यावर व परक्याच्या कृतीचे परिणाम आपणांवर घडत असतात. कोणत्याहि मनुष्याने काही वाईट कर्म केले तर त्याच्या प्रतिफलाने त्याची बुद्धि भ्रष्ट होऊन दिवसेंदिवस तो अधिकच वाईट होत जातो; तसेंच शुभकर्माने बुद्धि शुद्ध झालेल्या मनुष्याची प्रवृत्ति दिवसेंदिवस अधिक चांगल्या कर्माकडे आपोआप वळते. हा अनुभव आपल्यांपैकी बहुतेकांस आलाच असेल. आपण जी कर्मे करितो त्यांचे परिणाम परस्परांवर घडत नसते तर वर दाखविलेली बुद्धीची वाढ अधिक चांगल्या अगर अधिक वाईट दिशेने झाली नसती. जड पदार्थासंबंधी केलेल्या अवलोकनावरूनहि वरील प्रमेयाची सिद्धि होते. एखाद्या खोलीत एका जातीची दोन तीन तंतुवाद्ये असली आणि आपण त्यांपैकी एखादें वाद्य वाजवून कांहीं विशिष्ट स्वर उत्पन्न केला तर त्या स्वराने हवेवर जे तरंग उत्पन्न होतात ते बाकीच्या वाद्यांवर आदन त्यांतून सजातीय स्वराची उत्पत्ति करितात. ही गोष्ट पदार्थविज्ञानशास्त्राने सिद्ध केली आहे. तसेंच माझ्या मनांत कांहीं विचारतरंग उठले तर त्यांचा परिणाम सजातीय मनांवर होऊन तेथेही तत्सदृश विचारांची उत्पत्ति होते. प्रत्यक्ष आघाताने वाद्यांतून निघणारा स्वर जितका स्पष्ट असतो तितका तरंगांच्या