पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


कांहीं ह्मणणे असेल तें सर्व चुकीचे असे वाटणे हा मानवी स्वभावच आहे. यासाठी जगावर सुधारणा लादण्याची इच्छा तुझांस होईल तेव्हां कुत्र्याच्या शेपटाच्या गोष्टीचे स्मरण करा. जगाच्या नादी लागून आपले डोके फिरवून घेऊन आपल्या विश्रांतीचा भंग करावा यांत काय शहाणपण आहे बरें ! तुह्मीं जन्मभर निजून राहिलांत, व जगाकडे ढुंकूनहि पाहिले नाही, तरी जग जसें चालावयाचे तसे चालणारच. यासाठी आपलें सुखदु:ख जगाच्या बऱ्यावाईटावर न ठेवितां व आततायीपणा न करितां अलिप्त मनाने कर्म करीत राहणे इतकेंच आपले कर्तव्य आहे. यत्किंचितहि हटवादीपणा अंगी आहे तोपर्यंत खरे चांगले कार्य आपल्या हातून कधीहि होणे नाही. ज्याच्या चित्तांतून अहंकार नष्ट झाला आहे, निस्सीम शांतता ज्याच्या हृदयांत वास करीत आहे, खरे प्रेम आणि सहानुभूति ज्याच्या हृदयांत उत्पन्न झाली आहे, तोच पुरुष सत्कर्म करून इतरांच्या उपयोगी पडतो आणि स्वतःचेंहि कल्याण करून घेतो. आततायी मनुष्याला सहानुभूति ह्मणजे काय याची ओळखहि नसते. जगाची दु:खें हलकी करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी कधीहि येत नाही, अथवा तो स्वतःचेंहि कल्याण करून घेत नाही.

 यासाठी थोडक्यांत तुह्मांस इतकेच सांगावयाचें की, जग आपलें ऋणी नसून आपण जगाचे ऋणी आहों ही गोष्ट प्रथम लक्ष्यांत बाळगिली पाहिजे. परोपकार करणे ह्मणजे पर्यायाने स्वतःच्या कल्याणाचाच प्रयत्न करणे होय, हा दुसरा मुद्दा ध्यानांत धरण्यासारखा आहे. तसेंच जग तुमच्या आमच्या मदतीसाठी अडून राहिले नसून त्याचा नेता व शास्ता परमेश्वर आहे, याचा विसर पडू देऊ नये. त्याची तेथे नित्य वस्ती असून त्याच्या उद्योगास कधींहि खळ पडत नाही. तो यच्चयावत् प्राणिमात्राची काळजी वाहून त्याच्या बऱ्याचा मार्ग त्याला दाखवितो. सर्व विश्व झोपी गेलें तरी तो जागत असतो. जगांत जें जें कांहीं दृष्टीस पडतें तें त्याच्यामुळेच होय. या गोष्टी नित्य लक्ष्यांत बाळगिल्या पाहिजेत. आणखी असे की, जग जसें आजवर चालत आले आहे तसेच अनंत काळपर्यंत राहणार. यासाठी कोणावर रागावण्यांत अथवा कोणाचा द्वेष करण्यांत फायदा नाही. गरीबदुबळ्यांस शक्य ती मदत करणे आणि दुष्टावरहि प्रेम करणे इतकेंच आपले कर्तव्य आहे. जग हे मोठ्या तालीमखान्यासारखें आहे. कसरतीने जसे शरीर धष्टपुष्ट होते तसे या तालीमखान्यांत कसरत करून मन धष्टपुष्ट होते. तसेच कोणत्याहि कार्यात हट्ट आणि माथेफिरूपणा