पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१०७


घेऊन ये." भुताने उत्तर दिले, " राजवाड्यांत द्रव्यकोश आणून ठेविला. आतां आणखी काम सांग.” त्या बिचाऱ्या गरीब मनुष्याची छाती धडधडू लागली. जे सांगावें तें काम झालेच आहे, असे हे भूत ह्मणतें तर आतां त्यास काय काम सांगावें ? असा विचार करता करतां तो मनुष्य एकदम पळत सुटला व सत्पुरुषाजवळ येऊन त्याला त्याने सर्व हकीगत सांगितली. त्याची हकीगत संपते न संपते तोच पाठोपाठ तें भूतहि येऊन हजर झाले आणि त्या मनुष्याला ह्मणाले, “आतां काम सांग, नाही तर तुला खाऊन टाकितो." त्याने त्या मनुध्यास खाऊन टाकिलें असते; परंतु सत्पुरुष इतक्यांत ह्मणाला, “अरे मनुष्या, त्या कुत्र्याचे शेपूट कापून आण, आणि या भुताला तें सरळ करावयास सांग." सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणे त्या मनुष्याने कुत्र्याचे शेपूट कापून आणिलें आणि तें भुताजवळ देऊन म्हटले. “ हे मला सरळ करून दे." भुताने मोठ्या कुशलतेने ते जमिनीवर ठेवून सरळ केले. परंतु त्याजवरील बोटे काढतांच ते पुन्हां वांकडे झाले. भुताने याप्रमाणे बराच वेळ खटपट करून पाहिली, परंतु तें शेपूट सरळ होईना. तेव्हां त्रासून ते ह्मणाले, “ खरोखर, साऱ्या जन्मांत मला कोणतेंहि काम इतकें अवघड वाटले नाही. अरे मनुष्या, जर तूं आतां या कामांतून मला मुक्त करशील तर तुला दिलेली दौलत बक्षीस देईन आणि पुन्हां कधीहि तुला त्रास देणार नाही." तो मनुष्य आनंदाने ह्मणाला, "बरें, तुझी अट मला मान्य आहे."

 हे जग कुत्र्याच्या शेपटासारखें सदोदित वांकडे आहे आणि हजारों वर्षे त्यास सरळ करण्याचा उद्योग अनेकजण करित आले आहेत. पण त्याच्यावरचा दाब ढिला पडल्याबरोबर ते पुन्हां लगेच वांकडे होते. हे असेंच चालावयाचे आहे. यासाठी जग सरळ करण्याच्या खटपटीस लागू नका. या इच्छेनें प्रेरित होऊन तुझी कोणतेंहि काम करूं लागला तर जग सरळ होत नाहीच पण तुम्ही मात्र वेडे होतां-आततायी होतां. जर हे आततायित्व जगांत उत्पन्न झालें नसते तर जगाची प्रगति सध्याहून अधिक झपाट्याने झाली असती. हट्टानें आणि आततायीपणानें कोणतीहि सुधारणा जगावर लादण्याचा प्रयत्न करणे मूर्खपणाचे आहे. यामुळे क्रोधादि शत्रुंची वाढ मात्र झपाट्याने होऊन मारामाऱ्या आणि रक्तपात होतात. तुमच्या हट्टामुळे तुह्मांबद्दल असलेली सहानुभूति मात्र लोकांच्या मनांतून नाहीशी होते. आपण जे कांहीं करतों तें उत्तम; आपणाजवळ जे काही आहे त्याला जगांत कोठें तोड नाही; तसेंच इतरांचे जें