पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


इतकी आपली अलिप्तता जागृत असली म्हणजे निराशेचे दुःख प्राप्त होण्याची भीति नको. अलिप्त राहून केलेल्या कर्मापासून दु:खाची प्राप्ति होणे ही गोष्ट सर्वथैव अशक्य आहे. आपण कांहीं केलें अथवा न केले तरी सुखदुःखांचे अनुभव घेत घेत हे जग असेंच अनंत कालपर्यंत चालावयाचे आहे.

एके गांवीं एक मनुष्य राहत होता. तो फार गरीब असल्यामुळे त्याला पैसा मिळण्याची इच्छा होती. त्याला कोणी असे सांगितले की, जर एखादें भूत तुला वश होईल तर तें तूं मागशील तें तुला आणून देईल. त्यालाहि हे सांगणे बरे वाटून तो भूत वश करून देणाऱ्या मांत्रिकाचा शोध करूं लागला. शोध करतां करतां त्याला शेवटी एक सत्पुरुष भेटला. त्या सत्पुरुषाला सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. तेव्हां त्याजजवळ जाऊन तो ह्मणाला, " महाराज, मला एखादें भूत वश करून द्याल काय ?" सत्पुरुषाने विचारिले, "बाबा, तुला भुताशी काय करावयाचे आहे ?" त्याने उत्तर दिले “वाटेल तें काम पार पाडण्याची शक्ति भुताला असते असें मी ऐकिलें आहे. तर कृपा करून मला माझ्या कामासाठी एखादें भूत मिळवून द्या.” त्यावर सत्पुरुष ह्मणाला, " वेड्या, असल्या भलत्याच नादाला लागू नको. आपल्या घरी जाऊन स्वस्थ बैस." दुसऱ्या दिवशी तो मनुष्य पुन्हां त्या सत्पुरुषाकडे जाऊन रडून आणि त्याची करुणा भाकून ह्मणाला, “ महाराज, कसेंहि करून एखादें भूत मला मिळवून द्याच." तेव्हां त्याच्या रडण्याला कंटाळून सत्पुरुष ह्मणाला, “ हा ताईत घेऊन जा आणि मी सांगतों तो मंत्र ह्मण, ह्मणजे एक भूत ताबडतोब तुजपाशी येईल. तें तूं सांगशील तें काम करील. पण संभाळ हो, भुतें मोठी भयंकर असतात. त्यांस एकसारखें कामास लाविले पाहिजे. जर एक क्षणभर तूं त्यास रिकामें ठेविलेंस तर तें ताबडतोब तुला खाऊन टाकील.” तो मनुष्य ह्मणाला, "अंः, त्यांत काय मोठे कठीण आहे ? त्याच्या जन्माला पुरून उरेल इतके काम मी त्याला देइन." असें ह्मणून व सत्पुरुषाने दिलेला ताईत घेऊन तो एका अरण्यांत गेला, आणि मंत्र ह्मणूं लागला. बराच वेळ मंत्राचा जप झाल्यानंतर एक मोठे धिप्पाड भूत त्याजजवळ येऊन ह्मणाले, " अरे, मी तुझा सेवक झालो आहे. तूं सांगशील ते काम मी करीन; पण जर क्षणभर मी रिकामा राहिलों तर ताबडतोब तुला खाऊन टाकीन." मनुष्य ह्मणाला, "बरें तर, माझ्यासाठी एक प्रचंड राजवाडा बांध." इतकें तो ह्मणत आहे तोच भुताने उत्तर दिले, “ राजवाडा बांधून तयार झाला. आतां आणखी काम सांग." मनुष्य ह्मणाला, " पुष्कळसें द्रव्य