पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१०५


पाहिजेत. प्रत्येक परोपकाराच्या कृत्याने आपल्या क्षुद्रवृत्ति नाश पावण्यास मदत होत असते. त्यामुळे आपण पवित्र होऊन पूर्णावस्थेस जातो. यासाठी आपल्या दातृत्वाचा गर्व वाहण्यासारखी त्यांत कांहींच थोरवी नाही. तुमच्या जवळ पांच चार लाख रुपये असले तर मोठा परोपकार तो तुह्मी काय कराल ! एखादें इस्पितळ बांधाल, एखादा टाऊनहॉल बांधाल, एखाद्या अधिकाऱ्याचा पुतळा उभाराल, अथवा कोणाला मोठी मेजवानी द्याल; पण विश्वशक्तीच्या दृष्टीने या लांबलचक यादीची खरी किंमत काय आहे ? ' बाडीबीचमें बंगला बनाया, रचा कमलका फूल।' ही गोष्ट खरी. पण जर पांचच मिनिटे प्रचंड झंझावात सुटला-विश्वांतील अनेक शक्तींपैकी एकच जागृत झाली-तर 'दो घडीसे देखना, तो आखर धूलकी धूल ।' असेंच ह्मणण्याची पाळी यावयाची ! एखादा ज्वालामुखी पर्वत लीलेने फूत्कार करूं लागला तर तुमची प्रचंड शहरें, लांबचलांब रस्ते आणि हजारों इमारती जागच्या जागीच भस्मसात् होतील. यासाठी जगाचे उपकारक ह्मणून गर्व वाहणे यासारखे दुसरें मूर्खत्व कोणतेंच नाही. तुमच्या अथवा माझ्या मदतीवांचून जगाचे अडलें आहे असें नाही. तर परोपकारामुळे आपल्या स्वतःच्या उन्नतीस मदत होते ही गोष्ट नित्य लक्षांत बाळगून आपण नेहमीं परोपकाररत राहिले पाहिजे. स्वत्व विसरून पूर्णव पावण्याचा हाच मार्ग आहे. एखादा भिकारी आमचे काही देणे लागत नसतो. पण आमची उपकारबुद्धि जागृत करून तो मात्र आम्हास ऋणी करून ठेवितो. माझ्यामुळे जगाचे अमुक बरे झाले अथवा अमक्या तमक्याला माझ्यामुळे मदत झाली हा विचारच मूर्खपणाचा आहे. ज्यामुळे अहंकार वाढतो असा प्रत्येक विचार मूर्खपणाचाच असतो व दुःखप्राप्ति होणे हे मूर्खत्वाचे निश्चित पर्यवसान आहे. एखाद्याला आपण कांही दिले आणि त्याच्याकडून कृतज्ञतादर्शक शब्दांची अपेक्षा केली असतां तो काहीच बोलला नाही ह्मणजे आपल्या अहंकारास ताबडतोब एक धक्का बसतो व आपणांस क्षणभर तरी दुःख होतें. आपण जे काही करतो त्याचे काही तरी प्रतिफल आपणांस मिळावे अशी इच्छा करणेच चुकीचे आहे. ज्याने उपकार करावयास संधी दिली त्याचे आभार मानणे रास्त आहे. परमेश्वराच्या पूजनाचा हा एक अत्युत्कृष्ट मार्ग आहे. दातृत्वबुद्धि असणे हे भाग्य सर्वांच्याच वांट्यास येत नाही. अशी बुद्धि हा एक मोठा हक्क आहे. हा हक्क आपणांस प्राप्त झाला आणि तो अमलांतहि आला याबद्दल आपणच कृतज्ञ असले पाहिजे. कोणत्याहि प्रतिफलाची अपेक्षा न करण्या