पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


आपण ज्या दृष्टीने विचार करितों तीप्रमाणे आपले चरित्र सुखाचे अथवा दुःखाचें असें आपणांस वाटते. सुख अथवा दु:ख वस्तुगत नसून आत्मगत आहे. ही जाणीव नसल्यामुळे अमुक जीवित सुखाचे आणि अमुक दुःखाचें अशी भावना करून कोणी हंसत असतो आणि कोणी रडत असतो ! उदाहरणार्थ, अग्नि हा स्वतः सुखमय नाही व दु:खमयहि नाही. परंतु कडाक्याची थंडी पडली असतां शेकोटीजवळ बसून आपण ह्मणतो, “अहाहा ! अग्नि किती सुखदायक आहे !" पण इतक्यांत एखाद्या निखाऱ्याला हात लागून बोटें भाजली ह्मणजे त्याच अग्नीला दोष देण्यासहि आह्मी तयार होतो. परंतु वास्तविक पाहिले तर अग्नीने आह्मांस सुख अथवा दु:ख या दोहोंपैकी स्वतः कांहींच दिले नसून दोन्ही भावना आमच्याच ठिकाणी होत्या, त्या प्रसंगानुरोधाने जागृत मात्र झाल्या. आपण ज्याप्रमाणे अग्नीचा उपयोग केला त्याप्रमाणे तो आपणांस सुखदायक अथवा दुःखदायक झाला. हीच गोष्ट जगासंबंधीहि खरी आहे. जग हे स्वतः अत्यंत पूर्णावस्थेत आहे. पूर्णावस्था ह्मणजे ज्या कार्याकरितां जगाची उत्पत्ति झाली, त्या कार्याच्या पूर्तीकरितां लागणाऱ्या साधनांनीं तें पूर्ण आहे असा अर्थ समजावा. आह्मीं जगलों अथवा मेलों तरी त्यामुळे त्या साधनांत कांहीं भर पडत नाही अथवा त्यांत कांहीं उणीवहि येत नाही. जगाच्या बऱ्याचा विचार करून मेंदूला शीण देण्याचे आस कांहीं कारण नाही.

 हे जरी खरे आहे तरी आपण सदोदित परोपकार करीत असले पाहिजे हेहि खरे आहे. परोपकाररत राहणे हे स्वतःच्याच फायद्याचे आहे व हा एक मोठा हक्कच आपणांस प्राप्त झाला आहे अशी जाणीव आपल्या अंतःकरणांत सदोदित असली तर त्या परोपकारवुद्धीचा एखाद्या प्रचंड चालक शक्तीसारखा आपणांस उपयोग होतो. एखाद्या भिकाऱ्याला काही द्यावयाचे तुमच्या मनात आले तर छाती काढून डौलाने एखादें नाणे त्याजकडे भिरकावू नका. तुमची उपकारबुद्धि त्याच्यामुळे जागृत झाली ही गोष्ट लक्ष्यांत ठेवून त्याला जे देणं असेल तें द्यावें. अशा कृत्यापासून जी कांहीं मानसिक उन्नति होते व मनाला शक्ति प्राप्त होते ती दान घेणाऱ्यास होत नसून दान देणाऱ्याला होत असते. परोपकाराच्या कृत्यांनी अहंकार मावळू लागतो, व अहंकार मावळू लागला ह्मणजे मनुष्य आपल्या पूर्णरूपाकडे जाऊं लागतो. कोणी तरी उपकार घेण्याच्या स्थितीत आहेत ह्मणून पूर्णरूप पावण्याच्या साधनांतील एकाचा आपणांस उपयोग करून घेतां येतो याजबद्दल उपकार घेणाऱ्याचे आपण आभार मानिले