पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१०३

आपणांसच उपयोग होत असतो ही गोष्ट विसरतां येत नाही. मी लहानपणी कांही पांढरे उंदीर बाळगिले होते. त्यांच्या पिंजऱ्यांत एक पितळेचा रहाट वसविला होता. ते उंदीर त्यावर चढू लागले ह्मणजे तो रहाट गरगर फिरूं लागे. उंदीर जों जों जलदीने पाय उचलीत तों तों रहाट अधिक झपाट्याने फिरूं लागे; परंतु या सर्व गतीचा शेवट पाहिला तर उंदीर आणि रहाट जागच्या जागीच असलेले आढळावयाचे. रहाटावरून पलीकडे जाण्यासाठी निघालेला उंदीर चालून चालून थकला तरी शेवटीं जागच्या जागींच रहावयाचा. जगाच्या कल्याणासाठी हाती वीरकंकण बांधून निघालेल्याची गोष्टहि अशीच आहे. अशा कृत्यांचा वास्तविक उपयोग म्हटला तर ती करणाराची नीतिमत्ता सुधारते व दृढ होते, हा होय. तत्वदृष्टया जगाला चांगले अथवा वाईट असें कांहीं निश्चित स्वरूपच नाही. जो ज्या दृष्टीने त्याजकडे अवलोकन करितो त्याप्रमाणे तें त्यास दिसते. 'ना जानुं तेरा राम कैसा है' असे कोणी कबीरास म्हटलें तेव्हां त्यावर त्याने उत्तर दिले 'राम जैसेकू वैसाहै.' हीच गोष्ट जगासहि पूर्णपणे लागू पडते. या दृष्टीने पाहतां प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःचे निराळेंच जग निर्माण करीत असतो असें ह्मणण्यास प्रत्यवाय नाही. जन्मांधाला दृक्प्रत्यय नसल्यामुळे जग थंड आहे, उष्ण आहे, कठीण आहे अथवा मृदु आहे, अशा प्रकारचा स्पर्शानुभव तो जगाविषयी सांगेल. एकाच मनुष्याविषयी विचार केला तरी त्याचे निश्चित स्वरूप अमुक असें ठरविता येणार नाही. एक ह्मणेल, 'हा लुच्चा आहे.' दुसरा ह्मणेल, 'हा चांगला मनुष्य आहे.' तिसरा ह्मणेल, 'हा फार प्रेमळ आहे.' चवथा ह्मणेल, ' हा दुष्ट आहे.' याचा अर्थ इतकाच की, त्या विशिष्ट मनुष्याविषयी ज्याला जसा अनुभव असेल तसें तो त्याचे स्वरूप समजेल. वस्तुतः आपण मनुष्य ह्मणजे सुखदु:खाचे डोल्हारे आहों; आपण ह्मणजे सुखाची आणि दुःखाची रहावयाची घरे. या माझ्या ह्मणण्याचा अनुभव आपल्या आयुष्यात आपणांस हजारों वेळ आला असेल. तरुण पुरुष आशावादी आणि मातारी माणसें निराशावादी असावयाची असा सामान्य नियम आहे. तरुणांपुढे आयुष्याचा बराच काळ शिल्लक असतो; आपले आयुष्य निघून गेलें ही जाणीव वृद्धांत असते. आपल्या पुढील काळांत आपल्या इच्छा तृप्त होतील असा भरंवसा तरुणाच्या हृदयांत असतो, आणि अतृप्त राहिलेल्या आशा वृद्धाच्या हृदयास आंच लावीत असतात. वास्तविक विचार केला तर अशा निरनिराळ्या अवस्थांतले तरुण काय अथवा वृद्ध काय, सारखेच मूर्ख असतात.