पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


गोड भाषण केले तर दु:खी स्त्रीचें अवनत मुख एकदम वर होते. तिजकडे पाहावें तो क्षणापूर्वीचा तो म्लान चेहरा जाऊन मंदहास्य त्या जागी विलसूं लागल्याचे आढळून येते. शब्दांत काय सामर्थ्य आहे याचा प्रत्यय याप्रमाणे क्षणोक्षणी आपणांस येतो. तत्वविचारांत काय अथवा सामान्य व्यवहारांत काय शब्दांचें-ध्वनिचिन्हांचें-सामर्थ्य सारखेच प्रकट होते. आपल्या जाग्रदवस्थेत या आपल्या सामर्थ्याचा मन मानेल तसा उपयोग आपण करीत असतो. या शक्तिसंबंधी कसल्याच प्रकारचा विचार आपल्या मनांत येत नाही, किंवा तिचें कांहीं कौतुकहि आपणांस वाटत नाही. आपल्या या सामर्थ्याची उपपत्ति समजून घेऊन तदनुरूप त्याचा योग्य उपयोग करणें हेंहि कर्मयोगाचेंच एक अंग आहे.

 रोजचा व्यवहार सुरळीत चालण्याकरितां आपणांस जी कांहीं कर्तव्ये करावी लागतात त्यांचे प्रायः दोन प्रकार आपण कल्पितों. एक स्वतःसाठी करावयाची कर्मे आणि दुसरा प्रकार ह्मणजे लोकांसाठी करावयाची कमें. या दुसऱ्या प्रकारच्या कर्तव्यांस परोपकाराची कामें असें आपण नांव देतो. ही परोपकाराची कामें करीत असतां आपण केवळ लोकांच्याच उपयोगी पडतों असें बाह्यतः दिसते; तरी वस्तुतः आपण आपल्या स्वतःच्या कल्याणासाठीच ती कामें करीत असतो. केवळ परोपकारासाठी काही उद्योग करणे हे चांगले आहे, व प्रत्येकानें ही इच्छा सदोदित करावी हे इष्ट आहे; परंतु परोपकारी कृत्यांचा तत्वदृष्ट्या विचार केला तर आपल्यावांचून जगाचें यत्किंचित्हि अडत नाहीं असें आपणांस दिसून येईल. आपण जन्मास येण्यापूर्वी जग सुरळित चालले होते व आपल्या पाठीमागेंहि तें सुरळीत चालणारच. त्याने आपल्या मदतीची केव्हांहि अपेक्षा केलेली नव्हती व सध्यांहि तें करीत नाही. एका ख्रिस्ती उपदेशकाचें एक धार्मिक प्रवचन माझ्या वाचनात आले. त्यांत तो ह्मणाला, “ही सर्व सुदर सृष्टि फार चांगली आहे. कारण तिजमुळे परोपकाराची कृत्ये करावयास आपणास संधी मिळते." केवळ वरवर पाहिले तर या विचारांत नाव ठेवण्यासारखे कांही नाही. पण आमच्या मदतीसाठी जग जणू काय वाटच पाहत आहे असा जो ध्वनि या भाषणांत निघतो तो जगाला आणि परंपरेने परमेश्वराला उपमर्दकारक नाहीं काय ? जग इतकें लंगडें लुलें आहे काय की, तुमच्या मदतीवांचून त्याचे त्याला काही करता येऊ नये ? जग अनंत प्रकारच्या दुःखांनी व्यापिलें आहे ही गोष्ट खरी; व दुःखितांचे संकट नाहीसे करण्यास आपण त्यांस मदत करावी हेहि युक्त आहे. पण त्या आपल्या मदतीचा शेवटी