पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राच्या शब्दस्वरूपांत काय सामर्थ्य आहे यांचा निश्चय करणे हे कर्मयोगाचेच एक अंग आहे. प्रत्येक धर्मात शब्दाचे अतिशय महत्व मानण्यांत आले आहे; इतकें की 'आरंभी शब्द होता, आणि शब्दांतून सृष्टि निर्माण झाली' असें कित्येक तत्त्ववेत्त्यांनी अनुमान केले आहे. परमेश्वराच्या चित्तांत उद्भूत झालेला विचार शब्दरूपाने बाहेर पडताक्षणीच त्याने सृष्टीचे रूप धारण केले. परमेश्वराच्या मनांत प्रथम विचार उद्भवला. विचाराचें इच्छेत रूपांतर झाले. इच्छेने शब्द उत्पन्न झाला आणि त्याने सृष्टीचे रूप धारण केले अशी सृष्टीची उपपत्ति कांहीं तत्वज्ञ सांगतात. वारंवार जूं घांसल्यामुळे बैलाच्या मानेस घट्टा पडून जसे तेथील ज्ञानतंतू मरून गेलेले असतात, तसेच आपले ज्ञानतंतूहि चालू व्यवहाराच्या रोजच्या घर्षणाने मठ बनतात. जो जो वृद्धापकाल अधिक होतो तो तों हा मठ्ठपणा वाढतच जातो. तशांतून सांप्रतच्या काळी जडवाद अधिक मोहकरूपाने नटलेला असल्यामुळे आपल्या ज्ञानदृष्टीवर एक आवरण अधिकच पडल्यासारखे झाले आहे. यामुळे आपल्या सभोंवतीं प्रत्यहीं घडणाऱ्या गोष्टींचे नुसतें महत्वहि आपणांस समजत नाहींसें होतें. तथापि मनुष्य कितीहि मठ्ठ असला तरी कित्येकवेळां असे काही चमत्कारिक प्रकार घडून येतात की त्याची जिज्ञासा जागृत झाल्यावांचून राहत नाही. अमुक गोष्ट अशी कां घडली हा विचार मनावर वारंवार आघात करून निद्रित जिज्ञासेस जागृत करितो. जिज्ञासा जागृत होणे ही ज्ञानार्जनाच्या मार्गातील पहिली पायरी आहे. शब्द आणि सृष्टीची उत्पत्ति यांविषयी जे नुकतेंच विवेचन केले त्यांतील तात्विक विचार क्षणभर बाजूस ठेविले तरी ध्वनिचिन्हांकडून रोजच्या व्यवहारांत बजाविली जाणारी कामगिरी कमी महत्त्वाची आहे असें नाही. याक्षणी मी तुह्मांशी बोलत आहे. तुह्मांपासून मी बऱ्याच अंतरावर आहे. माझा स्पर्श तुह्मांस होत नाही; तथापि माझ्या भाषणाने हवेवर उत्पन्न होणारे तरंग तुमच्या कानांत शिरून मनावर काही परिणाम उत्पन्न करितात. हा परिणाम होण्याचे बंद करणे तुमच्या हातांत नाही. तुह्मांस यत्किचित् स्पशेहि न करितां तुमच्या मनांत मी इतक्या अंतरावरून खळबळ उत्पन्न करू शकतों ही गोष्ट चमत्कारिक नाहीं काय ? एक मनुष्य दुसऱ्यास मूर्ख ह्मणतो. इतक्यांत तो दुसरा मनुष्य उभा राहन संतापाने दुसऱ्याच्या तोंडावर मारतो! हे शब्दाचे-ध्वनिचिन्हाचे प्रत्यक्ष सामर्थ्य पहा ! एखादी स्त्री दुःखव्याप्त होऊन रडत असली आणि इतक्यांत दुसरी स्त्री येऊन तिने तिच्याशी थोडेसें