पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भगिनी निवेदिता यांचा उपोद्धात.
------♦------


 स्वामी विवेकानंद यांनी दिलेल्या व्याख्यानांच्या योगें साऱ्या जगाला धर्ममार्गाचा खरा बोध होईलच; पण खुद्द भरतभूमीच्या लेकरांनाहि स्वतःच्या धर्माचें खरें स्वरूप कळण्यास त्यांचा आदर्शवत् उपयोग होईल. नवयुगाघाताने भरतभूमि शतधा विदीर्ण झाली आहे अशा वेळी तिच्या धर्माचें तारूँहि कोणीकडच्याकोणीकडे भडकावें यांत नवल नाही. प्रचंड वादळांत सांपडून इतस्ततः भडकणाऱ्या नौकेला चांगल्या बंदराच्या आश्रयाची अत्यंत जरूर असते. त्याच प्रमाणे हिंदुधर्मरूपी नौकेलाहि सध्याच्या काळी अशाच प्रकारच्या बंदराची अत्यंत आवश्यकता होती; ती उणीव स्वामी विवेकानंदांनी पूर्णपणे भरून काढली आहे. हिंदुधर्माचें वास्तविक स्वरूप काय आहे याचा बोध या व्याख्यानांत उत्तम रीतीने होईल.

 हिंदुस्थानांत जन्मलेल्या आणि हिंदुधर्माने दर्शविलेल्या अत्युच्च पदावर आरूढ झालेल्या एका हिंदु महात्म्याने हिंदुधर्माचा प्रसार करीत साऱ्या जगभर फिरावें ही गोष्ट इतिहासकालानंतर तरी प्रथमच घडून आली आहे. आपल्या धर्मात काय सांगितले आहे याचे ज्ञान करून घेण्याची इच्छा कोणाहि हिंदूस झाली, आपल्या मुलांस धर्मज्ञान देण्याची इच्छा कोणा मातेस झाली, तर अशी स्त्रीपुरुष विवेकानंदांच्या ग्रंथांकडे वळतील यांत संशय नाही. इंग्रजी भाषा हिंदुस्थानांतून समूळ नष्ट होण्याची वेळ कधी काळी आलीच तर त्यावेळींहि त्या भाषेतून स्वामीजींनी केलेलें ज्ञानदान शिल्लक राहून साऱ्या जगास फलद्रूप होईल यांत तिळमात्र संदेह नाही. सांप्रतकाळी विस्कळित झालेली हिंदुधर्मतत्वमौक्तिकें एका सूत्रांत गुंफून त्यांचा पक्का हार बनविण्याची अत्यंत आवश्यकता उत्पन्न झाली होती; तसेंच भौतिकशास्त्रांच्या प्रखर भट्टीतहि टिकून राहणारा धर्म जगाला सध्या हवा होता. ही दोन्ही कामें स्वामीजींनी आपल्या अमोघ सामर्थ्याने तडीस नेली. सनातनधर्मात जे चिरंतन सामर्थ्य वास करीत आहे, त्याचीहि साक्ष आपणांस येथे पटते. अत्यंत बिकट परिस्थितीतहि स्वामीजीसारखें नररत्न उदयास येऊन सनातनधर्माचा जिवटपणा जगास पटवितें, यावरून त्या धर्मातील चिरकाल टिकणाऱ्या सामर्थ्याचा पूर्ण प्रत्यय येतो.

 मानवी जीविताचे रहस्य इतरांस कथन करण्यांत स्वतःचेंहि हित आहे, ही गोष्ट आर्यभूमीस आजच प्रथम समजली असें नाही. आपणांस जें ज्ञान प्राप्त झालें