पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

९९


साहाय्याने आपला मार्ग बराच सोपा होतो. सर्व धर्मात आणि सर्वकाळी अशा प्रकारच्या काही विशिष्ट चिन्हांची योजना केलेली आहे. फार काय पण विशिष्ट चिन्हांवांचून तत्वविचार मनांत आणणेहि अशक्य आहे. शब्दसृष्टि ही विचारांची चिन्हेंच आहेत असें ह्मणावयास हरकत नाही. किंबहुना, सर्व दृश्य विश्वांतील प्रत्येक पदार्थ हे एक चिन्हच आहे. अदृश्य चैतन्यात्मक अधिष्ठानावर ही सर्व दृश्य सृष्टि उत्पन्न झाली आहे. ह्मणजे अदृश्य परमेश्वराचें सृष्टि हे दृश्य चिन्ह आहे. अशा रीतीने अस्तित्वात आलेली चिन्हसृष्टि ही केवळ मनुष्यकृतच आहे असें नाही. एखाद्या धर्माचे काही विद्वान एकत्र जमले आणि त्यांनी ही चिन्हें एकत्र विचार करून तयार केली असें नाही. अनेक सृष्ट पदार्थाप्रमाणेच या चिन्हांचीहि आपोआप वाढ झालेली आहे. असे नसते तर काही विशिष्ट चिन्हें पाहून अनेक व्यक्तींच्या चित्तांत एकाच प्रकारच्या कल्पना उद्भवल्या नसत्या. कित्येक चिन्हांचा तर सर्वत्र आणि सर्वकालीं सारखाच उपयोग होत असल्याचे आढळून येते. ख्रिस्तीधर्माच्या उदयाबरोबर क्रुसाचे चिन्ह प्रचारांत आले असावे असा तुह्मांपैकी बऱ्याचजणांचा समज असेल; पण वस्तुस्थिति तशी नाही. ख्रिस्तीधर्म जन्मास येण्यापूर्वी व मोझेसच्याहि जन्माच्या पूर्वी, वेदप्रचारांत आले नव्हते तेव्हांहि हे चिन्ह अस्तित्वात होते; इतकेच नव्हे पण मनुष्यकृतीची कोणतीहि नोंद नव्हती तेव्हांहि हे चिन्ह अस्तित्वात होतें. फिनीशियन आणि अ‍ॅझटेक्स लोकांतहि या चिन्हाचा उपयोग होत असल्याचे आढळतें. जगांतील सर्व जातीच्या लोकांस थोड्याशा फरकाने हे क्रुसाचे चिन्ह ठाऊक होते. त्याचप्रमाणे वर्तुळाचे चिन्हहि फार प्राचीनकाळापासून सर्वत्र प्रचारात असल्याचे आढळते. त्याचप्रमाणे स्वस्तिकाची आकृतीहि बहुधा सर्व देशांत आणि सर्वकाळी आढळते. बौद्धधर्माच्या प्रसाराबरोबर स्वस्तिकाच्या चिन्हाचा प्रसार झाला असावा असा समज होता; परंतु बुद्धाच्या जन्माच्याहि अगोदर या चिन्हाचा सर्वत्र उपयोग होत होता, असे आढळून आले आहे. जुन्या बाबिलोन आणि मिसर देशांत हे चिन्ह अस्तित्वात होते. ही चिन्हें कोणी विशिष्ट व्यक्तींनी विशिष्ट कारणापुरतीच प्रचारांत आणली नसावीं एवढी गोष्ट या हकीगतीवरून सिद्ध होते; एवढे नव्हे, तर मानवी मन आणि चिन्हें यांमध्ये काही तरी अदृश्य संकेत असावा असे वाटते. अशीच गोष्ट भाषेचीहि आहे. चार पुऱ्याांनी जमून अमक्या पदार्थास अमुक ह्मणावें असें ठरविल्याचे कोणास माहीत नाही. भाषेची रचना अशाप्रकारे झालीच नाही. तिची उत्पत्ति