पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

सिद्धांताचा उमजच पडत नाही. यामुळेच नित्य व्यवहारांत चढाओढ सुरू होते. अगोदरच मोहाने व्यापलेली बुद्धि चढाओढीने अधिक भ्रष्ट होते व राग, द्वेष, असूया इत्यादिकांचा प्रवेश होण्याजोगें महाद्वार तेथे उघडतें. रागद्वेषांचा प्रवेश बुद्धीत झाल्याबरोबर दयाक्षमादि दैवी गुणांचा झरा कोरडा होतो. कुरकुऱ्या स्वभावाच्या मनुष्याला जगांतील प्रत्येक कर्म नावडतेंच असतें. त्याला कोणी राजा केले तरी तो रडणार ! आणि रंकाच्या अवस्थेचाहि त्याला हेवा वाटणार! अशा मनुष्याच्या हातून कर्तबगारी ती कशाची होणार ! यासाठी प्राप्तकर्तव्ये आनंदाने आणि नेटाने पार पाडून आपण ज्ञानवान् होऊ या. आपण ज्ञानवान् झालों ह्मणजे मोक्ष आपल्या मागच्या दारीच आहे.

प्रकरण ५ वें.
परोपकार स्वतःसच कल्याणप्रद आहे.

 आपल्या आध्यात्मिक उन्नतीस कर्मयोग किती पोषक आहे याचा विचार पुढे चालू करण्यापूर्वी 'कर्म' या एका शब्दांत ज्या अनेक कल्पनांचा अंतर्भाव आह्मी हिंदुलोक करितों, त्यांपैकी आणखी एक कल्पना तुह्मांस प्रथम सांगणे इष्ट आहे. प्रत्येक धर्माची प्रमुख अशी तीन अंगें असतात. तत्वविचार, पुराणे अथवा दंतकथा आणि आचार. यांपैकी तत्वविचार हा भाग सर्वात अत्यंत महत्वाचा असतो हे उघड आहे. तत्वविचारांत ज्या तत्वांचे उद्घाटन असते त्यांचे प्रत्यक्ष आचरण कसे करावे याचा बोध दंतकथा व काल्पनिक गोष्टी यांवरून होतो. ठराविक आचारांमुळे तत्वविचारांस प्रत्यक्ष दृश्य स्वरूप येते. किंबहुना, आचार हे अमूर्त तत्वविचारांचे मूर्त रूपच होय. अगदी सामान्य बुद्धीच्या मनुष्यास आचारामुळे तत्वविचारांचे आकलन करणे सोपे जाते. कर्म या शब्दात अशा प्रकारच्या आचारांचा अंतर्भाव होतो. प्रत्येक धर्ममार्गात अशा प्रकारच्या आचारांची जरूर असते. आमची बुद्धि विचाराने तीव्र होईपर्यंत केवळ भावरूप सिद्धांताचें पूर्ण आकलन करण्याची तिला शक्ति नस. कोणताहि विषय लवकर कळतो असे आपल्या अहंकारामुळे आपणास वाटत असते; परंतु प्रत्यक्ष प्रसंग आला ह्मणजे निव्वळ भावरूप सिद्धांतापुढे आपल्या बुद्धीची कशी त्रेधा उडते हे अनुभवानेच कळण्याजोगे आहे. या कारणामुळे प्रत्येक धर्मात काही विशिष्ट खुणा अथवा चिन्हें यांचा उपयोग केलेला असतो. या चिन्हांच्या