पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


स्त्रीने मजकडे पाठविले आहे, नाहीं बरें ? आपण कृपा करून जरा थांबा. थोड्या वेळाने दुकान बंद करून आपण घरी जाऊं.' आतां येथे कोणता चमत्कार नजरेस पडणार याचा आपल्या मनाशी विचार करीत तो संन्यासी तेथे उभा राहिला. थोड्या वेळाने येण्याचे बंद झाले तेव्हां दुकान बंद करून व्याध त्या संन्याशाला बरोबर घेऊन आपल्या घरी गेला. ओसरीवर कांहीं बसावयास घालून व त्या संन्याशाला त्यावर बसवून व्याध आंत गेला. आंत जाऊन आपल्या वृद्ध मातापितरांस त्याने स्नान घातले व नंतर जेवू घालून ती तृप्त झाल्यानंतर तो बाहेर संन्याशाजवळ येऊन ह्मणाला, 'स्वामीमहाराज, आपण येथपर्यंत येण्याची तसदी घेतली, हा मजवर मोठा अनुग्रह आहे. आतां आपली कोणत्या प्रकारची सेवा करूं याबद्दल आज्ञा व्हावी.' यानंतर संन्याशाने अध्यात्मवियेतील अनेक कूट प्रश्न त्यास केले व व्याधाने त्या सर्वांची समर्पक उत्तरे दिली. तो कथाभाग वेदांतरसाने ओथंवलेला असून त्यालाच महाभारतांत व्याधगीता असें नांव आहे. त्या व्याधाचें तें ज्ञान पाहून संन्यासी अगदी थक्क होऊन त्याला ह्मणाला, 'तुह्मांस एवढ्या विमल ज्ञानाची प्राप्ति झाली असतां व्याधजातींत तुमचा जन्म का झाला ? आणि तसा जन्म झाला असला तरी मांस विकण्याचे ओंगळ कर्म तुह्मीं कां करतां? ' व्याध ह्मणाला, 'माझ्या बेटा, अमुक कर्म चांगलें, आणि अमुक कर्म वाईट ह्मणणे ही दृष्टीच खोटी आहे. जगांतील कोणतेंहि कर्तव्य वाईट अथवा अमंगल नाही. पूर्वकर्मानुसार मला ज्या परिस्थितीत जन्म आला, त्या परिस्थितीची कर्तव्येहि मला जन्मादारभ्यच प्राप्त झाली आहेत. लहानपणी मी हाच धंदा शिकलो. या धंद्यांत होणाऱ्या नफ्याने जसा मला आनंद होत नाही तसाच प्रसंगी होणाऱ्या तोट्याने मला शोकहि होत नाही.या दोहोंपासूनही अलिप्त राहून मी माझें कर्तव्य उत्तम प्रकारें बजावितों. गृहस्थाश्रमाला अनुरूप अशी माझी कर्तव्ये नीट संभाळून माझ्या मातापितरांची मी सेवा करतो. मी कसल्याहि प्रकारचे योगसाधन करीत नाही अथवा मी संन्यासीहि झाला नाही हे तुला दिसतच आहे. मला जे काही थोडे फार ज्ञान प्राप्त झाले आहे तें मी आपली कर्तव्यकर्मे अलिप्तपणे परंतु उत्तम रीतीने पार पाडल्यामुळेच प्राप्त झाले आहे.

 हिंदुस्थानांत सध्या एक महायोगी राहत आहेत. माझ्या साऱ्या आयुष्यांत त्यांच्या तोडीची विभूति माझ्या पहाण्यांत आली नाही. त्यांची वृत्ति थोडी विलक्षण आहे. कोणी काही प्रश्न विचारला तर ते त्याचे सरळ उत्तर ताबडतोब कधींच देणार नाहीत, कोणाचा गुरु होण्याची आपली योग्यताच नाही असें