पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जरा धीर धरा.' असा आतून आवाज आला. संन्यासी मनांतल्या मनांत फार संतप्त होऊन ह्मणाला 'अग भिकारडे, मला वाट पहायला लावतेस काय ? तुला अद्यापि माझ्या सामर्थ्यांचा प्रभाव कळला नाही ह्मणून तूं इतकी उद्दाम झालीस अं!' अशा प्रकारे तो मनांत विचार करीत आहे इतक्यांत आंतून पुन्हां आवाज निघाला. 'यतिराज, इतका अहंकार असणे अनुचित आहे. मी रानांतील पक्षी नव्हें." हे शब्द ऐकून संन्यासी अगदी चकित झाला. परंतु तेथून निघून न जातां तो तसाच वाट पाहत उभा राहिला. आणखी कांही वेळ गेल्यानंतर आंतून बोलणारी स्त्री भिक्षान्न घेऊन आली. तिजकडे पाहून मनांत ओशाळलेला तो संन्यासी तिला वंदन करून ह्मणाला 'माते, रानांतील हकीगत तुला कशी समजली ?' ती स्त्री ह्मणाली, 'माझ्या मुला, तुझा योगबीग मला काही समजत नाही. अगदी सामान्यप्रतीची अशी मी एक स्त्री आहे. माझे पति थोडेसे आजारी असल्यामुळे त्यांची शुश्रूषा मी करीत होते, इतक्यांत तूं आलास. त्यामुळे त्यांचे पथ्यपाणी होईपर्यंत तुला थांबावयास सांगणे मला भाग पडले. माझ्या पत्नित्वाची कर्तव्ये उत्तम पार पाडावी इतकेंच मला समजतें. आणि आजपर्यंत सर्वजन्म मी तेवढेच करीत आहे. माझे लग्न झाले नव्हते तेव्हां कन्या या नात्याने माझ्या मातापितरांची मी सेवा केली. लग्न झाल्यापासून माझ्या प्रिय पतीची सेवा मी करीत आहे. माझें योगसाधन ह्मणशील तर इतकेंच. मला सध्या जे काही थोडेबहुत ज्ञान प्राप्त झाले आहे तें या सेवेमुळेच होय. त्या ज्ञानानेच रानांतील सर्व इतिवृत्त मला कळलें. तुला याहून कांहीं अधिक जाणण्याची इच्छा असली तर...गांवीं एक व्याध असतो त्याची भेट घे ह्मणजे तुझी इच्छा तृप्त होईल. बाजारांत चवाठ्यावर त्याचे दुकान आहे.' व्याधाचें नांव ऐकून तो तरुण संन्यासी मनांत प्रथम थोडा खजील झाला; परंतु त्यावेळेपर्यंत जे कांही त्याच्या अवलोकनांत आले होते, त्यामुळे उत्पन्न झालेली त्याची जिज्ञासा त्याला स्वस्थ बसू देईना. तो तेथून निघून त्या स्त्रीने सांगितलेल्या गांवीं गेला व बाजारांत जाऊन त्या व्याधाचे दुकान त्याने शोधून काढले. दुकानांत एक भला लठ्ठ व्याध हाती मोठा सुरा घेऊन बसला आहे व मांसाचा विक्रय करीत आहे असें त्याच्या दृष्टीस पडले. त्याला पाहून संन्यासी मनांत ह्मणाला, 'देवा ! आतां या खाटकापासून ज्ञानप्राप्ति होणार.! हा तर निव्वळ यमदूत दिसतो. तो असा विचार करीत आहे, इतक्यांत त्या व्याधाचीहि नजर संन्याशाकडे जाऊन त्याने पटले, "स्वामी महाराज, आपणास...गांवच्या एका