पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

 मातृत्व हे सर्व जगांत अत्यंत श्रेष्ठ असें मानिले आहे. स्वार्थ अथवा आपलपोटेपणा विसरावयास शिकावयाचे असेल तर तें मातेपाशी शिकावें. ईश्वरीप्रेमावांचून दुसरे कोणतेंहि जगांतील प्रेम मातृप्रेमापेक्षा श्रेष्ट नाही. मातृप्रेमाहून प्रेमाचे इतर सर्व प्रकार निःसंशय हलक्या प्रतीचे आहेत. स्वतःच्या सुखाकडे न पाहतां आपल्या मुलांच्या सुखाकडे प्रथम लक्ष्य पुरविणे हे मातेचे आद्यकर्तव्य आहे. मुलांच्या सुखाकडे प्रथम लक्ष्य न पुरवितां जी आईबापें स्वसुखार्थ अत्यंत दक्ष असतात ती जवळ जवळ पशुपक्ष्यांच्या कोटींत बसविण्यास योग्य आहेत असे समजावें. पिलांना पंख फुटून ती स्वरक्षणास योग्य झालीं ह्मणजे ज्याप्रमाणे आईबाप व पिलें ही परस्परांची ओळख विसरतात त्याचप्रमाणे मुलें मोठी व मिळविती झाली ह्मणजे आईबापांनी घालून दिलेला धडा गिरवून वृद्ध मातापित्यांकडे ती दुर्लक्ष्य करितात. परमेश्वराचें सृष्टीवरील प्रेमच स्त्रीरूपाने उद्भवले आहे असें ज्या पुरुषास वाटतें तो पुरुष धन्य होय ! परमेश्वराचें पितृत्व पुरुषरूपाने व्यक्त झाले आहे असें ज्या स्त्रीस वाटते ती स्त्री धन्य होय ! आणि मातापितरें ही खचित परमेश्वररूपेंच आहेत असा ज्या मुलांचा निश्चय आहे ती मुलेंहि धन्य होत !

 आत्मविकासाचा निश्चित मार्ग ह्मटला ह्मणजे प्राप्तकर्तव्ये निश्चयाने पार पाडण्यास प्रथम शिकले पाहिजे. अशी कर्तव्ये करीत असतां निश्चय पक्का होत गेला ह्मणजे आत्मश्रद्धा व निश्चयाचे बळ ही वाढत जातात व त्यांमुळे स्थितप्रज्ञाची स्थिति प्राप्त होते. याविषयीं महाभारतांत एक कथा आहे ती मी आपणांस सांगतो. एकेवेळी एक तरुण संन्यासी अरण्यांत तप आचरीत होता. बरीच वर्षे योगसाधन केल्यानंतर एके दिवशी तो एका वृक्षाखाली बसला असतां वरून कांही वाळलेली पाने व काटक्या त्याच्या अंगावर पडल्या. तेव्हा त्याने वर पाहिलें तो दोन पक्षी भांडत असलेले त्याच्या दृष्टीस पडले. त्यांजकड पाहून संन्याशास क्रोध येऊन तो ह्मणाला, 'अरे, मी खाली बसलो असता मला त्रास देण्यास तुमची छाती तरी कशी झाली ?' असें ह्मणून मोठ्या क्रोधान त्या पक्ष्यांकडे त्याने अवलोकन केले. त्यावेळी त्याच्या ठिकाणी असलेले योगसामर्थ्य अग्निज्वालेच्या रूपाने प्रगट होऊन क्षणार्धात ते बिचारे पक्षी जळून भस्म झाले ! स्वतःच्या तप:सामर्थ्याची ही प्रतीति पाहून त्या योग्यास मोठा हर्ष झाला. काही वेळानें तो नेहमीप्रमाणे भिक्षा मागण्यास गांवांत गेला. गांवांतील एका घरी जाऊन 'माई, भिक्षा लाव' असा त्याने पुकारा केला. 'बावाजी,