पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

९३

खालच्या पायरीच्या मनुष्याच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा असाच अर्थ असतो असें वाटते. त्याच्या इंद्रियजन्यसुखतृप्तीच्या आड कांहीं आलें तर तो आपलें स्वातंत्र्य गमावलें ह्मणून शेंडी उपटण्याच्या बेतास येतो; पण वास्तविक विचार केला तर हे स्वातंत्र्यहि नव्हे आणि ही अनिरुद्धताहि नव्हे. अशा प्रसंगी सहनशीलता दाखविणे हे खरे स्वातंत्र्य प्रगट करणे होय. परक्यासाठी स्वतःच्या क्रोधादि भावनांवर ज्याचा पूर्ण ताबा चालतो तो परतंत्र नसून स्वतंत्र आहे - गुलाम नसून धनी आहे - असे समजावें. पतीने एखादी गोष्ट अपल्या मनासारखी केली नाही असे वाटतां क्षणींच स्वातंत्र्य गेलें ह्मणून ओरड करणारी स्त्री स्वतःच्या क्षुद्र मनोविकारांची पक्की दासी बनलेली असते. तिला खऱ्या स्वातंत्र्याची प्राप्ति स्वप्नांतहि शक्य नाही. आपल्या स्त्रीस सदोदित नांवें ठेवीत असलेल्या पुरुषाचीहि स्थिति वास्तविक अशीच आहे. केव्हांहि परद्वार न करणे हे स्त्रीपुरुषाचे पहिले कर्तव्य आहे. खऱ्या पतिव्रतेच्या प्रेमाचा प्रभावच असा आहे की पुरुष कितीहि बिघडला असला तरी तिच्या अमृततुल्य मधुर वाणीने तो सन्मार्गवर्ती झाल्यावांचून राहणार नाही. स्त्रीच्या शुद्ध आणि क्षमाशील वर्तनाने ज्याचे हृदय यत्किचितहि द्रवणार नाही, इतका पशुतुल्य मनुष्य क्वचितच असेल. खरोखर, जग अद्यापि इतकें बिघडलेले नाही. पुरुष जात भ्रष्ट व पशुतुल्य झाली आहे अशी ओरड आपण सर्वत्र ऐकतों, परंतु स्त्रियांच्या संबंधाने विचार केला तर बऱ्याच स्त्रियांवरहि हा आक्षेप लागू होणार नाही काय? स्त्रिया तोंडाने बोलून दाखवितात तितक्या जर त्या खरोखर पवित्र असत्या तर सर्व जगांत एकहि वाईट पुरुष सांपडताना; याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे. पावित्र्याला अजिंक्य असा एकहि दुर्गुण जगांत नाही. स्वतःच्या पतीशिवाय इतर सर्व पुरुषांकडे केवळ पुत्रदृष्टीने अवलोकन करावयाचें इतकी जिची दृष्टि पवित्र झाली आहे तिला भ्रष्ट करण्याला चंग बांधून कोणी आला तरी तिच्या समोर आल्याबरोबर त्याचे अपवित्र विचार मावळून तो तिजकडे केवळ मातृभावानेच अवलोकन करील. पतिव्रता अनसूयेच्या गोष्टीचें तात्पर्य हेच आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्या पत्नीशिवाय इतर सर्व स्त्रीजातीकडे केवळ मातृभावाने अगर भगिनीभावाने अवलोकन करावयाचे असें पुरुषाने आपले वर्तन ठेविले पाहिजे. तसेंच धर्मज्ञान देण्याचे ज्याने पत्करिले असेल त्याने सर्व स्त्रियांस मातेसमान पूज्य मानून तदनुरूप प्रत्येक स्त्रीशी आपले वर्तन ठेविले पाहिजे.