पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


लागतें. प्रथम लहानसान सुखें सोडावयास आपण तयार झालो म्हणजे संवयीने आपली कर्तव्याची कल्पना अधिक विस्तृत होऊन मोठया सुखाच्या कल्पनाहि हळुहळू विराम पावू लागतात. ज्या मूळतत्वांवर सांप्रतची समाजाची रचना झाली आहे ती तवेंहि याच स्वरूपाची आहेत. मनुष्यप्राणी संघ अथवा समाज करून राहूं लागला ह्मणजे त्याच्याभोवती काही सामाजिक बंधनें आपोआपच उद्भवतात. त्यामुळे त्याचा उच्छृखळपणा आपोआप नाहीसा होतो. तसेंच केवळ स्वतःच्या सुखापुरताच उद्योग करावयाचा ही त्याची पशुबुद्धि हळुहळू कमी होत जाते. इतरांसाठीहि काही तरी कर्तव्य ह्मणून मला करावयाचे आहे ही जाणीव त्याच्या ठिकाणी उद्भवते; व शेवटी स्वतःच्या एकाच देहाशी संलग्न असणारा आकुंचितपणा टाकून देऊन विश्वव्यापक व्हावयाची संधीहि सध्यांच्या समाजरचनेत त्यास प्राप्त होते. अशी ही समाजरचना कोणी जाणूनबुजून निर्माण केली असेल अथवा अनंतकालाच्या अनुभवाने तीस हे स्वरूप प्राप्त झाले असेल. तें कसेंहि असले तरी सांप्रतच्या समाजरचनेचे स्वरूप वर दाखविल्याप्रमाणे झाले आहे ही गोष्ट खरी.

 केवळ कर्तव्य ह्मणून कोणतेंहि काम करावयाचें म्हटलें ह्मणजे तो मार्ग अगदी अकंटक नाही असा आपणांस अनुभव येऊ लागतो. ज्या मनुष्याबद्दल आपल्या मनांत यत्किंचिहि प्रेमबुद्धि नाही अशा मनुष्यासाठी एखादें काम कर्तव्य ह्मणून करण्याची वेळ आली ह्मणजे आपल्या मनाची स्थिति कशी होते ती अनुभवानेच जाणिली पाहिजे. गाडीच्या चाकाला वंगण नसले झणजे प्रत्येक फेरीला जसें तें कर्णकटु आवाज काढिते तसेंच आपले मनहि अशा प्रसंगी हरघडी आपणाशी भांडूं लागते. केवळ प्रेमाच्या वंगणाने हे कर्मचक्र सुरळीत चालते. हे वंगण मनुष्याजवळ नसते तर आईबाप मुलांसाठी ज्या खस्ता खातात, पुरुष पत्नीसाठी जो स्वतःला प्रसंगी विकूनहि घेतो ते त्या केले असते काय ? जेथे प्रेमाचा अभाव असतो, अशा एखाद्या कुटुबात होणारे तमाशे आपण नेहमी पहातोंच. केवळ प्रेमामुळेच आपला कर्तव्यमार्ग सुखकर होतो; आणि प्रेमाचा प्रवाह ज्या मानाने अनिरुद्ध व स्वतंत्रपणे चालेल त्या मानानें तो अधिक अधिक विस्तृत व खोल होत जातो. येथे अनिरुद्धता-स्वतंत्रता-ह्मणजे काय याचा विचार केला पाहिजे. इंद्रियजन्य सुखासाठी त्यांचा गुलाम होऊन राहणे, क्रोधास वश होणे व व्यवहारांत नित्य उद्भवणाऱ्या हजारों विकारांस बळी पडणे हे स्वातंत्र्य आहे काय ? अगदी