पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

९१


आपणांस समजतें. आपल्या डोळ्यांवर आत्मप्रौढीची जी धुंदी असते ती अशा धक्यांनी खाड्कन् उतरते. यदृच्छेनें प्राप्त झालेल्या उच्च दर्जाची कर्तव्ये उत्तम प्रकारे चालविण्याची एखाद्याला पात्रता नसली तर त्याचा तो उच्च दर्जा फार दिवस टिकून राहणे शक्य नाही. ज्याला त्याला त्याच्या योग्येतनुरूप त्याच्या जागी बसविणे हे सृष्टीचे कामच आहे. तेव्हां त्याबद्दल रिकामी कुरकुर करून फायदा नाही. याकरितां कोणाचीहि खरी योग्यता केवळ त्याच्या दर्जावरून पारखतां येत नाही. एखादा मनुष्य हलकें काम करीत असला तर केवळ तेवढ्यावरूनच त्याची योग्यता कमी लेखणें अनुचित आहे. कार्य कसलेंहि असो, तो मनुष्य ते कोणत्या प्रकारे आणि किती उत्साहाने पार पाडतो याचा विचार करणे अवश्य आहे.

 या नंतर कर्तव्याविषयींच्या आपल्या कल्पनेत आणखीहि थोडा बदल केला पाहिजे, असें आपणांस आढळून येईल. अत्यंत निरपेक्षबुद्धीने प्रेरित असल्याशिवाय कोणतेंहि महत्वाचे काम आपल्या हातून नीटपणे पार पडत नाही. असें आहे तरी अमुक एक काम कर्तव्य ह्मणून मला केले पाहिजे अशी भावना नसेल तर एखाद्या कार्याचा आरंभहि आपणाकडून व्हावयाचा नाहीं; यासाठी प्रथम कर्तव्य ह्मणूनच एखाद्या कार्यास आरंभ करावयास पाहिजे. व शेवटी स्वार्थबुद्धीचा पूर्ण नाश होऊन जगांतील हरएक कर्म ह्मणजे परमेश्वराचे प्रत्यक्ष पूजनच आहे असे वाढू लागलें झणजे खरें निष्काम कर्म आपल्या हातून होऊ लागतें व आपणांस अलिप्तता ह्मणजे काय याचा खरा अर्थ कळतो. अनेक प्रकारची स्वार्थी कर्मे अनंतकालापासून आपण करीत असल्याने आपल्या ज्ञानमय मूलरूपावर अज्ञानाचा जो दाट पडदा पडला आहे तो नाहीसा करून आपल्या ज्ञानस्वरूपास पूर्णपणे व्यक्त होण्यास अवसर करून देणे हेच सर्व योगमागांचें ध्येय आहे; व कर्मयोगाचे तरी वास्तविक रहस्य हेच आहे. ज्ञानदृष्टया आपण आपल्या चालू स्थितीत अगदी खालच्या दर्जाचे लोक आहों, व जी कर्मे स्वसुखासाठी ह्मणून आपण करितों त्यांत आपल्या शक्तीचा व्यर्थ व्यय फार होऊन आपल्याभोंवती असलेल्या जाळ्यांत अधिकच गुंतागुंत होत जाते. अशी गुंतागुंत न होतां पहिल्या जाळ्याची बंधनें हळूहळू ढिली कशी करावयाची व शेवटीं अज्ञानरूपी जाळ्यांतून आपणांस कसे मुक्त करून घ्यावयाचे हे रहस्य कर्मयोगाने आपणांस प्राप्त करून घ्यावयाचे आहे. कर्तव्य ह्मणून कोणतेंहि कार्य आरंभिलें ह्मणजे त्याच्या पूर्ततेकरितां हलक्या प्रतीच्या सुखकल्पनांवर आपणांस पाणी सोडावें