पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


स्वतःच्या देशांत करण्याचे त्यांच्या स्वप्नांतहि येणार नाही अशा गोष्टी परक्या देशांत ते बिनदिक्कत करतात. युरोपियन आणि अमेरिकन लोकांस चिनी लोक 'परकीय पिशाच्चे' ह्मणतात, तें बहुधा अशा कारणामुळेच असावे. अमेरिकन अथवा युरोपियन लोकांत असणारे चांगले गुण त्या बिचाऱ्यांच्या प्रत्ययासच आले नसावे.

यासाठी आपली अंतर्दृष्टि जागत करून परकीयांचे वर्तन त्यांच्या स्वतःच्या चालीरीतीशी सुसंगत आहे की नाही हे पाहण्यास शिकले पाहिजे. आपल्या चालीरीतींवरून परक्यांच्या वागणुकीवर टीका करणे कधीहि इष्ट होणार नाही. सर्व सृष्टीने माझ्या वर्तणुकीप्रमाणे चालावें असा एखादा ताम्रपट मी मिळविला आहे काय ? सारे जग कांहीं माझ्या सुखासाठी निर्माण झाले नाही ही गोष्ट प्रत्येक मनुष्याने नित्य लक्ष्यांत बाळगून सर्वत्र सहानुभूति ठेविली पाहिजे. भोंवतालच्या परिस्थित्यनुरूप आपल्या कर्तव्याची दिशा बदलते हे ध्यानांत ठेवून विशिष्ट प्रसंगी स्वतःच्या मनास पवित्र व युक्त वाटेल असें वर्तन ठेवणे हेच आपले कर्तव्य आहे. आपला जन्म ज्या परिस्थितीत झाला तिला अनुरूप अशी कांहीं सामान्य कर्तव्ये लावून दिलेली असतात, ती प्रथम नीट करणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच ज्या समाजांत आपण लहानाचे मोठे झालों त्या समाजाच्या स्थितीस आणि स्वतःच्या दर्जास अनुरूप अशी काही सामाजिक कर्तव्ये असतात ती नीटपणे पार पाडणे हे आपले दुसरें कर्तव्य आहे. असें करीत असतां जो एक मोठा अडथळा आपल्या वाटेंत नेहमी येत असतो त्याचा आतां विचार केला पाहिजे. हा मोठा अडथळा झटला ह्मणजे आत्मप्रौढी हा होय. आपल्या हातून कधीं कांहीं चूक होत असेल असें आपणांस वाटत नाही. आपल्याला याच क्षणी राज्यावर बसविलें तरी तितकी आपली योग्यता आहेच असें आपणांस नित्य वाटते. ही भावना नित्य जागत राहिल्यामुळे आपला आत्मपरीक्षणाचा मार्ग बंद झालेला असतो. एखादें राज्य चालविण्याची पात्रता खरोखरच आपल्या अंगी असली तरी चालू परिस्थितीत प्राप्त होणारी कर्तव्ये उत्कृष्ट रीतीनें बजावून आपली पात्रता आपण प्रथम सिद्ध केली पाहिजे. आपण हलक्या दर्जाचे असलो तरी त्या दर्जाची कर्तव्ये उत्तम प्रकारे केली ह्मणजे वरचा दर्जा आपणांस आपोआप प्राप्त होतो. लौकिक व्यवहाराच्या भोवत शिरून आपली कर्तव्ये आपण करूं लागलों ह्मणजे चोहोंकडून जे धक्केचपेटे आपणांस सोसावे लागतात त्यांमुळे आपली स्वतःची खरी योग्यता काय आहे हे