पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

८९


वागणे आपले कर्तव्य आहे असे एखादा अमेरिकन ह्मणतो. तसेंच एखादा हिंदु आपल्या चालीरीती सर्वोत्कृष्ट असतात, आणि त्या चालींप्रमाणे न वागणारा तो पापी होय असें ह्मणत असतो. अशा प्रकारची चूक तुमच्या आमच्या सारख्या सामान्य मनुष्याच्या हातून होणे साहजिक आहे; तथापि असल्या क्षुल्लक वाटणाऱ्या चुकीचे फार वाईट परिणाम होतात. शिकागो प्रदर्शनांत मी प्रथमच गेलों असतां पाठीमागून एका अमेरिकन गृहस्थाने माझ्या पटक्याचे टोंक धरून ओढले. मी मागे वळून पाहिले तेव्हां त्याच्या पोषाखावरून तो सभ्य गृहस्थ असावा असे मला वाटले. मी त्याच्याशी भाषणास सुरवात केल्याबरोबर मला इंग्रजी भाषा येते असे पाहून तो गृहस्थ फार ओशाळला. त्याच प्रदर्शनांत दुसऱ्या वेळी एका गृहस्थाने मला धक्का दिला. मी त्याला तसे करण्याचे कारण इंग्रजीत विचारले तेव्हां तोहि फार खजील झाला, आणि 'असा पोषाख का करतां' असें कांहीं पुटपुटत स्वारीने तेथून पाय काढला. सामान्यतः कोणत्याहि मनुष्याला दुसऱ्या मनुष्याबद्दल वाटणारा आत्मभाव, या गृहस्थांच्या मते जणूं काय भाषेत किंवा पोषाखांतच असतो. आरंभी असल्या गोष्टी अगदी क्षुल्लक वाटल्या तरी त्यांचे परिणाम कित्येक वेळां फारच वाईट होत असतात. बलिष्ठ राष्ट्र एखाद्या दुर्बल राष्ट्राचा छळ, कित्येक वेळां याच प्रकारच्या क्षुल्लक कारणासाठी करीत असतात. केवळ भिन्न चालीरीती पाहून त्यांच्या मनांतील सहानुभूतीचा झरा जणूं काय आटूनच जातो. फार कशाला, माझा पोषाख पाहून बुजलेला गृहस्थ कदाचित् खरोखरच चांगल्या स्वभावाचा असेल; आपल्या आप्तेष्टांशी व मुलाबाळांशी तो फार चांगल्या प्रकारे वागत असेल; तसेंच आपली इतर लौकिक कर्तव्येहि तो चांगल्या रीतीने पार पाडीत असेल; परंतु आपल्या चालीपेक्षां निराळ्या चालीचा पोषाख दृष्टीस पडतांच त्याचा चांगुलपणा एकदम कोठे नाहीसा झाला! मनुष्य परठिकाणी गेला ह्मणजे तेथील लोकांकडून त्याला अनेक प्रकारचा उपसर्ग पोहोचतो असें सर्वत्र आढळते आणि असे होण्याचे कारण पाहिले तर, त्या त्या देशांतील चालीरीती त्याला माहित नसल्यामुळे, त्याला स्वतःचे संरक्षण करणे दुरापास्त होते, इतकेच. पण यामुळे आपल्या देशास परत जातांना परकीयांबद्दल अत्यंत अनिष्ट ग्रह आणि द्वेष तो बरोबर घेऊन जातो. जहाजांवरील खलाशी, सैन्यांतील शिपाई आणि बारीकसारीक व्यापारी परक्या देशांत गेले ह्मणजे किती विक्षिप्तपणे वागतात हे तुह्मांस ठाऊकच असेल. ज्या गोष्टी