पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


नवल नाही. अठराव्या शतकात हिंदुस्थानांत ठग या नांवाचे लोक राहत असत. मनुष्ये मारणे हाच त्यांचा जन्मजात व्यवसाय होता. यामुळे खून करणे हेच आपले कर्तव्य आहे असे प्रत्येक ठगास वाटे. जो सर्वात अधिक खून करील तो सर्वोत अधिक पुण्यवान् असें ते समजत. एखादा मनुष्य रस्त्याने जात असतां त्याने आपली बंदुक रोखून दुसऱ्या एखाद्या मनुष्याचा प्राण घेतला तर त्याला साहजिकपणे आपल्या कृत्याबद्दल वाईट वाटेल निदान तसें वाटण्याचा बराच संभव आहे; परंतु तोच एखाद्या पलटणीत शिपाई असला आणि लढाईत त्याने वीस मनुष्ये मारली तर अशा वेळी आपण आपल्या जन्मभूमीची मोठीच कामगिरी बजाविली असें वाटून त्यास मोठा आनंद होईल. यावरून केवळ कृत्यावरूनच कर्तव्याचे क्षेत्र निश्चित होत नाही. यामुळे अमुक एक कृत्य कर्तव्य आणि अमुक एक अकर्तव्य असें निश्चितपणे सांगतां येणे शक्य नाही; तथापि कर्तव्य कशास ह्मणतां येईल याचे विवेचन भावरूपाने करता येण्याजोगे आहे. ज्या कृत्याने आपले हृदय शुद्ध होऊन त्यांत परमेश्वराचा उदय होण्यास अवसर सांपडतो तें पुण्यकर्म असून आपले कर्तव्य आहे. तसेच ज्या कृत्याच्या योगानें अंतःकरण मलीन व दुष्ट होण्याचा संभव असतो तें दुष्कृत्य असून त्याज्य आहे असे समजावें. ही पापपुण्याची अथवा कर्माकर्माची भावरूप व्याख्या झाली; तरी हिजवरून अमुक कृत्य करावें अथवा अमुक कृत्य करूं नये असें विधिनिषेधात्मक वचन सांगणे शक्य नाही. असें आहे तरी सर्व काळी, सर्व स्थळी आणि सर्व धर्माचें जीबद्दल एकमत झालेले दिसतें अशी पापपुण्याची एकच व्याख्या आहे. ती ' परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् । ' या संस्कृत उक्तींत उत्तमप्रकारे व्यक्त झाली आहे.

 धर्म कोणता आणि अधर्म कोणता याविषयींचे विवेचन भगवद्गीतेत वर्णधर्मानुसारें केले आहे. वर्णानुरोधानें प्रत्येकाचे गुणकर्म व मनोधर्म कोणत्या प्रकारचे असण्याचा संभव आहे याचा साधारण निर्णय होतो. यामुळे ज्या परिस्थितीत आणि वर्णात आपला जन्म झाला असेल त्या वर्णाला त्या परिस्थितीत कोणती कर्मे अभिमत होतात याचा विचार करून त्यांतून स्वतःला कल्याणप्रद आणि मनःशुद्धिकर अशी कर्मे निवडून काढतां येतात; तथापि सर्व देशांत आणि सर्व काळी एकाच प्रकारच्या स्थितीतील निरनिराळ्या समाजांत पापपुण्याच्या कल्पना एकसारख्याच असत नाहीत. ही वस्तुस्थिति लक्ष्यांत न आल्यामुळे एक राष्ट्र दुसऱ्याचा द्वेष करते. अमेरिकन चालीरीतींप्रमाणे