पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

८७


राळ्या देशांत निरनिराळ्या प्रकारच्या असतात हे मी पूर्वी सांगितलेच आहे. त्याच प्रमाणे निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या कर्तव्यविषयक कल्पना प्रचलित असतात. कुराणांत ज्या गोष्टी कराव्या ह्मणून सांगितले आहे त्या करणे हे माझें कर्तव्य असें मुसलमान ह्मणेल. हिंदु ह्मणेल की वेदाची जी अनुज्ञा तें माझें कर्तव्य. तसेंच बायबलांत सांगितल्याप्रमाणे वागणे हे माझें कर्तव्य असे एखादा ख्रिश्चन मनुष्य ह्मणेल. निरनिराळ्या काळी, निरनिराळ्या देशांत आणि निरनिराळ्या परिस्थितीस अनुरूप अशा कर्तव्याच्या कल्पना प्रचलित असल्याचे इतिहासादि ग्रंथांवरून दिसून येते. जिचे प्रत्यक्ष स्वरूप अमुक ह्मणून दाखवितां येत नाही अशा कोणत्याहि भावरूप कल्पनेची निश्चित व्याख्या सांगणे कठीण आहे. कर्तव्य ही कल्पनाहि अशाच विषयांपैकी आहे. रोजच्या सामान्यव्यवहारांत घडून येणाऱ्या कारणकार्यांवरून आपल्या कर्तव्याची फक्त कल्पना मात्र आपणांस करता येते. आपल्या डोळ्यांसमोर ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्या अवलोकन केल्याबरोबर त्या त्या प्रसंगी आपले कर्तव्य काय आहे, याची जाणीव आपोआपच आपल्या ठिकाणी उत्पन्न होते. हे कदाचित् आपल्या उपजत बुद्धीने होत असेल अथवा पूर्वानुभवहि कदाचित् याचे कारण असेल. तें कसेंहि असले तरी ही जाणीव जागृत झाल्याबरोबर मन त्या गोष्टीचा आपोआप विचार करू लागते. एखाद्या विशिष्ट प्रसंगी ज्या प्रकारे वागणे आपले कर्तव्य आहे असें आज आपल्या मनांत येते तसाच प्रसंग उद्या आला तर कदाचित् आजच्या अगदी उलट वागणे हेच कर्तव्य आहे असे आपल्या मनांत येण्याचा संभव आहे. कर्तव्य ह्मणजे काय असा प्रश्न केला तर आपल्या सदसद्विवेकबुद्धीस अनुसरून वागणे' असें उत्तर सामान्यतः बहुतेकांकडून आपणांस मिळेल. परंतु या उत्तराने सर्व प्रसंगी निर्वाह होतो असें नाही. उदाहरणार्थः एखाद्या ख्रिस्ती मनुष्याजवळ गोमांसाचा काही पदार्थ असला आणि तो त्याने कोणा क्षुधार्तास दिला नाही अथवा स्वतःहि क्षुधार्त असतां भक्षण केला नाही, तर तो ख्रिस्ती मनुष्य स्वतःच्या दृष्टीने कर्तव्यभ्रष्ट ठरेल. उलटपक्षी एखाद्या हिंदूजवळ तें गोमांस असलें आणि केवळ भुकेने जीव गमावण्याची वेळ आली ह्मणूनच त्याने तें भक्षण केले अथवा अशा वेळी दुसऱ्यास दिले तर आपण कर्तव्यभ्रष्ट झालों असें त्या हिंदूस खचित वाटेल. गाईच्या पूज्यतेसंबंधी ज्या गोष्टी लहानपणापासून त्याने ऐकिलेल्या असतात, त्यांचा परिणाम चित्तावर होऊन गोमांस भक्षण करणे ह्मणजे घोर पातक असें त्यास वाटले तर त्यांत