पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

शिकू लागलो होतो त्या वेळी एक इंग्रजी गोष्टींचे पुस्तक माझ्या वाचनात आले होते. त्यांतील एक गोष्ट मला आठवते ती अशी:-एका गांवीं एक मुलगा राहत होता. तो कोठे कामावर लागलेला होता. त्याला मिळणाऱ्या वेतनांतला कांहीं भाग तो आपल्या आईला देत असे; आणि या त्याच्या कृतीचे वर्णन लेखकानें मोठ्या कौतुकानें तीन चार पाने केले होते. तुह्मांस खरेंच सांगतों की आमच्या हिंदु मुलांस या गोष्टीचे तात्पर्य समजणे फार जड जाईल. 'जो तो आपापल्या पुरता' ही तुमची ह्मण त्यावेळी मला ठाऊक नव्हती, ह्मणून त्यावेळी त्या गोष्टीचे महत्व माझ्या ध्यानांत नीटसे आले नव्हते; परंतु तें आतां मला समजलें. आईबाप उपाशी मेले आणि बायकापोरांनी भीक मागितली तरी स्वतः अजीर्ण होईपर्यंत जेवणारे लोक मला तुमच्या या देशांत प्रथमच आढळले! छे ! छे ! कोणत्याहि गृहस्थाश्रमी मनुष्याने असलें राक्षसी ध्येय आपल्या पुढे ठेवू नये.

 आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून कर्मयोगाचे रहस्य तुमच्या ध्यानांत बरेंच आले असेल. देहपात होण्याची वेळ आली तरी आश्रमधर्मापासून पराङ्मुख न होतां आणि कसलीहि बडबड न करतां कोणाच्याहि मदतीस पुढे होणे हा कर्मयोगाने सुचविलेला एक महत्वाचा मुद्दा आहे. हजारों लोकांनी तुह्मांला फसविलें तरी मागणारा कोणी भेटला की जवळ असेल तर ते त्यास द्यावयाचे हा तुमचा धर्म आहे. आपल्या दानाचा आपल्या तोंडानें कधींच उच्चार करूं नये, आणि दान घेणाराकडून नुसत्या कृतज्ञतेचीहि अपेक्षा करूं नये. संन्याशापेक्षांहि गृहस्थाश्रम किती कठीण आहे याची तुह्मांस आतां चांगलीच कल्पना झाली असेल. खरा त्यागी होऊन कांहींच न करतां राहणे हे जितकें कठीण आहे, तितकेंच-किंबहुना त्याहून अधिक असें गृहस्थाश्रमधर्माने राहणे हे आहे.

प्रकरण ४ थें
कर्तव्य.

 कर्तव्य ह्मणजे काय याचा विचार कर्मयोगाच्या विवेचनांत करणे अवश्य आहे. मला कोणतीहि गोष्ट करावीशी वाटली तर तें माझें कर्तव्य आहे की नाही याचा प्रथम विचार करून नंतर तें कर्म मी करीत असतो. नीतिविषयक कल्पना निरनि