पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ब्राह्मण, त्याची पत्नी आणि मुलगा व सून अशी त्या कुटुंबांत चार माणसें होती. त्या गरीब ब्राह्मणास जी कांहीं थोडी प्राप्ति अध्यापनामुळे होत असे तींत त्या कुटुंबाचा कसाबसा निर्वाह चाले. अशा स्थितीत एकेवेळी तीन वर्षे अवर्षण पडल्यामुळे मोठा दुष्काळ पडून त्या बिचाऱ्या ब्राह्मणाच्या यातनांस पारावार नाहीसा झाला. अशा स्थितीत कित्येक दिवस उपवास पडला असतां एके दिवशी थोडें सातूचे पीठ त्या ब्राह्मणास मिळाले. त्या पिठाचे त्याने चार भाग केले. त्याच्या भाकरी तयार करून त्या आतां खाणार इतक्यांत दारांत एक अतिथि येऊन उभा राहिला. 'अतिथि देवो भव' अशी धर्माज्ञा असल्यामुळे तो ब्राह्मण अतिथीस ह्मणाला, 'यावें महाराज, भोजनाची तयारी आहे.' असें ह्मणून त्याने आपलें ताट त्या अतिथीपुढे ठेविलें. अतिथीने त्या अन्नाचा एकच घांस करून झटले, 'भल्या गृहस्था, मी दहा दिवसांचा उपवासी आहे. तुमच्या या थोड्याशा अन्नाने माझी क्षुधा अधिक प्रदीप्त मात्र झाली.' त्या अतिथीचे हे भाषण ऐकून ब्राह्मणपत्नी पुढे येऊन ह्मणाली, 'महाराज, हा माझा भागहि आपण भक्षण करावा.' ब्राह्मणाने तिला तसे न करण्याविषयी सांगितले. पण ती धर्मनिष्ठ स्त्री ह्मणाली, 'आपण गृहस्थाश्रमी आहों, त्या अर्थी क्षुधिताला अन्न देणे हा आपला धर्म आहे.' अतिथीने तेंहि अन्न भक्षण केले; तरी त्याची क्षुधा शांत होईना. तेव्हां ब्राह्मणपुत्र ह्मणाला, 'महाराज हा माझा भाग घेऊन मजवर अनुग्रह करावा; पित्याच्या धर्माचरणांत सहाय होणे हा पुत्रधर्म आहे.' अतिथीने तोहि भाग भक्षण केला तरी त्याचे समाधान झाले नाही. तेव्हां ब्राह्मणस्नुषेनें आपलाहि भाग त्याला दिला. तो भाग खाऊन अतिथि तृप्त झाला व त्या कुटुंबास आशीर्वाद देऊन चालता झाला. त्याच रात्रीं क्षुधेनें तें सर्व कुटंब मरण पावलें. तो अतिथि जेवला त्या ठिकाणी, भाकरीचे कांहीं कण पडले होते त्यांत लोळल्यामुळे माझें अर्धे शरीर सुवर्णाचें झालें हें तुह्मी पाहतच आहां. असाच यज्ञ आणखी कोठे होत असेल तर पाहावा ह्मणून सर्व जगभर मी फिरलों, परंतु असा यज्ञ कोठेच न झाल्यामुळे माझें अर्धे शरीर अद्यापि सुवर्णाचे झाले नाही. येथे मोठा यज्ञ झाला असें ऐकल्यामुळे मी येथे आलों, तरी माझें शरीर अद्यापि सुवर्णाचे झाले नाही. यावरून मी की येथे यज्ञ झालाच नाही."

 मित्रहो, हिंदुस्थानांतील हे सुवर्णयुग आतां काळाच्या पोटांत गडप झाले आहे. आर्यभूच्या पोटी खरी पुत्ररत्ने आतां कमीच निपजतात. मी नवीनच इंग्रजी