पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


कोसळतात. कोणत्याहि प्रकारच्या फलाची अपेक्षा न करतां कर्म करून ते ईश्वरास अर्पण करणे हा साकार परमेश्वराच्या पूजनाचा अत्यंत श्रेष्ठ असा विधि आहे. आपण देवाला वाहिलेले जिन्नस जसे परत घेत नाही तसेंच कर्म करीत असतां ती सर्व-बरी अथवा वाईट-परमेश्वरास अर्पण करावी. कर्म करीत असतां ही गोष्ट नित्य लक्षांत बाळगली तर आपल्या चित्तास हळू हळू तशी संवय लावता येईल. प्रत्येक कर्म 'कृष्णार्पण' ह्मटले ह्मणजे कोणत्याहि मनुष्याकडून प्रतिफळ मिळावें ही इच्छाच आपणांस करता येत नाही. श्रीकृष्ण ह्मणतात 'यत्करोषि यदश्रानसी यज्जुिहोपि ददासि यत् । यत्तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥' स्वतः परमेश्वरहि अशाच प्रकारें नित्य कर्म करूनहि फलाची अपेक्षा न केल्यामुळे नित्यमुक्त असतो. अशा रीतीने कर्म करणारा मनुष्य एखाद्या मोठ्या शहरांतील अत्यंत पापी लोकांच्या वस्तीत राहिला तरी पाप त्याला स्पर्शहि करू शकणार नाही. कमळाचें पान जसें पाण्यांत राहूनहि ओलें होत नाही, तसेंच असा मनुष्य प्रत्यक्ष पापकूपांत राहिला तरी त्याला पापाचा स्पर्श होऊ शकत नाही. 'ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः । लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा ॥' असें गीतेत सांगितले आहे.

 यासंबंधी महाभारतातील एक कथानक तुम्हांस सांगतो. कौरव व पांडव यांजमधील युद्ध संपून कौरवांचा नि:पात झाल्यावर राज्यपद प्राप्त झालेल्या पांडवांनी एक मोठा यज्ञ केला. त्या यज्ञांत गोरगरिबांस मोठमोठी दाने करण्यांत त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. तें दानशौर्य पाहून लोकांनी तर तोंडांत बोटच घातले. असा यज्ञ आमच्या ऐकण्यांतहि झाला नाही असें जो तो ह्मणूं लागला. तो यज्ञ समाप्त होण्याचे वेळी एक मुंगुस तेथें आला. त्याचे अर्धे शरीर सुवर्णाचें होतें; व बाकीचे अर्धे नेहमीप्रमाणे साधे होते. तेथें आल्याबरोबर यज्ञाच्या जागी जाऊन तो मुंगुस गडबडा लोळू लागला; व लोळतां लोळतां मणूं लागला, “काय हो, हे लोक किती खोडसाळ आहेत तरी ! मला सांगतात की येथे मोठा यज्ञ झाला ! परंतु येथे यज्ञ झाल्याचे कांहींच चिन्ह नाही!" लोक ह्मणाले "मूर्खा, येथे यज्ञच झाला नाही असें कसें ह्मणतोस ? आज या हस्तिनापुरांत गरीब असा कोणीच राहिला नाही. कारण यज्ञांतील दान घेऊन प्रत्येकजण गबर होऊन बसला आहे. असे असतां तूं यज्ञ न झाल्याचे सांगतोस त्या अर्थी तूं पक्का वेडाच असला पाहिजेस." यावर मुंगुस ह्मणाला, "मी सांगतो ती गोष्ट ऐका. एका लहानशा खेड्यांत एक गरीब ब्राह्मणाचे कुटुंब होते.