पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.


फारशी कधी गेलेलीच नसते. 'केवळ लोकांसाठी, केवळ देशासाठी' अशी भाषा आपण तोंडाने वापरीत असतां अंत:करणाच्या अगदी खोल भागांत कीर्तीची अपेक्षा दडून बसलेली असते. ज्या ठिकाणी कसल्या तरी प्रकारची फलाशा असते तेथे खऱ्या प्रेमाचा प्रवेशच होऊ शकत नाही; आणि जेथें खरें प्रेम नाहीं तेथें अलिप्तता तरी कशी येणार? तसेंच जेथें अलिप्तता नाही तेथे मुक्तीहि नाहीं; अशी ही परंपरा आहे. यासाठी आपण जेव्हां कोणतेंहि कर्म करतो तेव्हां तें केवळ कर्तव्य या दृष्टीने केले पाहिजे. त्यांत प्रतिफलाची कोणतीच आशा असतां उपयोगी नाही. असें कर्म करण्याची संवय जसजशी पक्की होत जाईल तसतशी आपल्या अंगी खरी अलिप्तता येईल.

 आपल्या इंद्रियसुखाभिलाषाचे आपण नित्य गुलाम असतो असें पूर्वी सांगितलेच आहे. ज्याप्रमाणे गुलाम होऊन काम केल्यामुळे तें काम फलरूपाने आपणास बाधक होते, तसेच आपल्या इंद्रियांवर ताबा चालवून त्यांचा धनी होऊन-निरपेक्षपणाने केलेले कर्म, मोक्षदायक होतें. 'वशे हि यस्योंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता।' असें भगवान् श्रीकृष्णाचे वचन आहे. हक्क आणि न्याय हे शब्द व्यवहारांत आपल्या कानांवरून अनेक वेळां जात असतात; परंतु खऱ्या दृष्टीने पाहतां या शब्दांना लहान पोरांच्या बडबडीपेक्षा अधिक महत्व कोणी देतोसें दिसत नाही. मानवी जातीचा नित्य व्यवहार अवलोकन केला तर तींत मुख्य असे दोन मनोधर्म आढळतात. एक सामर्थ्य आणि दुसरी दया. मनुष्याच्या सामान्य वर्तणुकीत यांपैकी कोणत्या तरी एका मनोधर्माचे प्राबल्य आढळतें. दया विसरून जेव्हां आपलें सामर्थ्य मनुष्य प्रगट करूं लागतो तेव्हां त्याची स्वार्थबुद्धि अत्यंत बळावलेली असते. अगदी सामान्य प्रतीच्या मनुष्याचा व्यवहार पाहिला असतां तो आपल्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्याचा उपयोग एकसारखा करीत असतो असे आढळून येईल. दया ही क्वचित् आढळणारी चीज आहे. दयाशील अंतःकरण ह्मणजे प्रत्यक्ष स्वर्गच आहे. ज्याच्या अंत:करणांत दयेचा विपुल सांठा आहे असा मनुष्य खरोखर परम भाग्यवान आहे. खरी न्यायबुद्धि जगांत फार थोडी आढळते; यासाठी हक्क आणि न्यायपद्धति यांची रचना दयेच्या पायावर केलेली असावी. आपल्या धर्मबुद्धीच्या वाढीला आड येणारा फार मोठा अडथळा ह्मटला ह्मणजे आपल्या कर्मापासून प्रतिफलाची अपेक्षा करणे हा होय. अशा अपेक्षेमुळे केवळ धर्मबुद्धीची वाढ खुंटते इतकेंच नाही, तर तीमुळे आपणांवर अनंत दुःखपरंपराहि