पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

बरीच कल्पना आपणांस होते. स्वतःला कसलीच इच्छा नसतां केवळ प्रेमाने वश होऊन भगवान् कर्म करतो ह्मणूनच तें कर्म अलिप्तपणाने होते. त्यांत इंद्रियजन्यसुखाच्या अभिलाषाची यत्किंचित् छटा उत्पन्न झाली की अलिप्तता आणि प्रेम या दोहोंचाहि बरोबरच नाश होतो. इंद्रियसुखार्थ प्रेम करणाऱ्या मनुष्याचे लक्ष्य बहुधा जडविषयापलीकडे जात नाही. एखाद्या पुरुषाचे अमूक स्त्रीवर प्रेम जडलें असें आपण ह्मणतो; परंतु वस्तुस्थिति पाहिली तर ते प्रेम त्या स्त्रीच्या शरीरावर जडलेले असते. तो तिच्या निरनिराळ्या अवयवांचे चिंतन करतो. ह्मणजे प्रेम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विकाराचे स्वरूप, जड विषयांत जें आकर्षण नित्य असते त्या आकर्षणाच्याच स्वरूपाचे आहे. लोखंडाचे जसें लोहचुंबकावर प्रेम असते, तसेंच मनुष्यांतील प्रेमाचेंहि वास्तविक स्वरूप असते. यामुळे एखाद्या यःकश्चित् कारणानेंहि अशा प्रेमाचा विपर्यास होऊन त्यांतून दु:खाची उत्पत्ति होते. खऱ्या प्रेमाचे स्वरूप याहून फार निराळे आहे. ते जडविषयाशी कधीहि संलग्न होऊन राहत नाही; तर जडविषयांपलीकडे असलेल्या चैतन्यरूपांत तें एकजीव होऊन राहते. खरें प्रेम करणारी अशा प्रकारची दोन मनुष्ये हजारों मैलांवर एकामेकांपासून निराळी असली तरी त्यांच्या प्रेमांत अंतर पडत नाही; तें कधीं नष्ट होत नाही, अथवा त्यांतून दु:खाचीहि उत्पत्ति होत नाही.

 अशा प्रकारची अलिप्तता स्वतःच्या ठिकाणी आणणे ही गोष्ट सोपी नाही. याचा क्षणोक्षणी अभ्यास केला तर एक आयुष्य पुरे होईपर्यंत याची प्राप्ति झाली तर होईल; परंतु याची प्राप्ति झाल्याबरोबर खरें प्रेम आणि मुक्ति ही प्राप्त होतात. सध्या आपणाभोंवती पक्केसे दिसत असलेले जगाचे पाश खटाखट तुटून पडतात आणि सृष्टीचें खरें स्वरूप काय आहे याचा आपणांस बोध होतो. आपणांसाठी शृंखला बनविण्याचे काम सृष्टि सोडून देते यानंतर जे काही आपण करतो त्यांची भलीबुरी फळे आपणांस सेवन करावी लागत नाहीत. आपल्या कृतीचे फळ गोड आहे की कडू आहे, हे पाहण्याची आपणांस जरूरच राहिलेली नसते.

 वास्तविक विचार केला तर आपण ज्यांना 'आपले' असें ह्मणत असतो त्यांवर तरी आपले खरे प्रेम असते काय ? खुद्द आपले आपल्या मुलांवरील प्रेमहि खरोखर प्रेम या नांवास पात्र नसते. त्यांत कोठेंना कोठे स्वार्थांचा अंश असतोच. सूक्ष्म विचार करून पाहिले तर आपली दृष्टि स्वार्थापलीकडे