पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

८१

शिवाय दुसरें त्याला काहीच दिसत नाही. अहाहा! स्वर्गीय प्रेम ! स्वर्गीय प्रेम !! परंतु जरा थांबा. या प्रेमाचे आपण सशास्त्र पृथक्करण करूं ह्मणजे त्याचे खरे स्वरूप आपणांस समजून येईल. तिनें सदोदित जवळ असावें, जवळच उभे राहावें, जवळच खावें आणि प्यावें असें त्यास वाटते; ह्मणजे तिने जवळ जवळ या स्वारीचा गुलामच बनून राहिले पाहिजे. तिला जणूं काय स्वतंत्र अशी काही हालचालच नाही. तिच्या तोंडांतून पडणारा प्रत्येक शब्द झेलण्यास हा तयार असतो. या कृतीचा खरा अर्थ ह्मणजे तिला स्वतःचा गुलाम करून हा स्वत: तिचा गुलाम बनतो. आतां या दोन गुलामांच्या प्रेमाचे खरे स्वरूप कितपतसे चिरस्थायी असणार बरें ! ती कोठे क्षणभर बाहेर गेली तर याने वेड्यावांकड्या कल्पना करून स्वतःस दु:खी करून घ्यावे. मित्र हो, हे खऱ्या प्रेमाचे स्वरूपच नव्हे. इंद्रियजन्यसुखाच्या अभिलाषाने वेडावलेल्या मनुष्याची ती एक लहर आहे. आणि तो बोलून चालून वेडा झालेला असल्यामुळे भ्रमानें तें प्रेम आहे असा त्यास भास होतो आणि त्या लहरीच्या भरांत स्वर्गीय प्रेम ह्मणून तो नाचूं लागून दुसऱ्यासहि आपणासारखाच क्षणभर वेडा करतो. जर याच्या ह्मणण्याप्रमाणे एखादी गोष्ट करण्याचे तिने नाकारले तर याची तबियत बिघडली ! खऱ्या प्रेमापासून उद्भवणाऱ्या चैतन्यतरंगांतून दु:ख कधीहि आपली वाट काढूं शकणार नाही. ज्या ठिकाणी दु:खाची उत्पत्ति होतांना आढळते तें खरें प्रेमच नव्हे. ती वास्तविक भलतीच कांहीं वस्तु असून भ्रमाने प्रेम ह्मणून तिला आपण कवटाळित असतो. ज्या दिवशी कोणत्याहि वस्तूवर अथवा प्राण्यावर तुमचें खरें प्रेम जडेल-मग तें स्त्रीवर असो, पुत्रावर असो अगर दुसऱ्या कोणावर असो - त्या दिवशी तुह्मांस विश्वव्यापी प्रेमाची गुरुकिल्ली सांपडेल व त्याच दिवशी अलिप्तपणा ह्मणजे काय याचाहि बरोबर उलगडा होईल.

 भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला ह्मणतात, 'न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन । नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतंद्रीत: । ममवानुवर्तते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् । संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः॥' याचा भावार्थ असा आहे की ' मला या जगापासून काही प्राप्त करून घ्यावयाचे आहे ह्मणून मी कर्म करित नाही; परंतु या जगावर माझें प्रेम असल्यामुळे त्याच्या बऱ्यासाठी मी कर्म करतो. मी कर्म न केले तर हे लोकहि कर्म न केल्यामुळे अनेक प्रकारें नाश पावतील.' यावरून प्रेम आणि अलिप्तपणा यांचीस्वा. वि. ६