पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


बाजूस ठेवून केवळ प्रेमाने प्रेरित होऊन कार्य करा. येथे प्रेम हा शब्द न कळण्याजोगा आहे. पूर्ण स्वतंत्रतेशिवाय खरें प्रेम उत्पन्न होणे अशक्य आहे. तुम्ही एखाद्याला गुलाम ह्मणून विकत घेतले आणि हातापायांत बिड्या ठोकून त्यास कामास लाविलें तर, काम केले पाहिजे ह्मणून तो काम करील; परंतु तुमच्याबद्दल त्याच्या मनांत प्रेम उत्पन्न होणे कधी तरी शक्य आहे काय ? तसेंच स्वतःच्या इंद्रियांचा जो दासानुदास बनून गेला आहे त्याच्या चित्तांत प्रेमाचा उद्भव होणे शक्य नाही. इंद्रियसुखार्थ कोणाचाहि बळी द्यावयास तो मागेपुढे पाहणार नाही. अशा मनुष्याने केवढालेहि उद्योग केले तरी तात्विकदृष्ट्या खऱ्या कर्माची योग्यता त्याच्या उद्योगास येऊ शकतच नाही. त्याने स्वतःकरितां केलेले उद्योग असोत अथवा आपल्या आप्तेष्टांकरितां ह्मणून केलेली कामें असोत, त्यांची किंमत खऱ्या कर्माच्या योग्यतेच्या मानाने पाहिली तर जवळजवळ शून्य इतकीच असते. यासाठी प्रत्यक्ष अथवा परंपरेनें जोपर्यंत आमची कर्मे स्वसुखाभिलाषाने प्रेरित होऊन केली जात आहेत, तोपर्यंत ती कर्मे त्या गुलामाच्या कर्मासारखींच आहेत. खऱ्या प्रेमाने प्रेरित होऊन केलेल्या कर्माचा मोबदला आपणांस सुखसंवेदनांच्या रूपाने मिळत असतो. ज्यापासून आपल्या चित्तास शांतीचा आणि तज्जन्य सुखाचा लाभ होत नाही असें एकहि प्रेमप्रेरित कार्य नाही. चिरकालिक चैतन्य, चिरकालिक ज्ञान आणि चिरलिक प्रेम यांचा सदैव एकत्र वास असतो; जणूं काय ही तिन्ही एकजीवच होऊन गेली आहेत, या तिहींपैकी कोणतेंहि एक तुह्मांस कोठे आढळले तर बाकीची दोन तेथें अवश्य सांपडलीच पाहिजेत. वस्तुतः एकाच मूलरूपाची ती तीन अंगे आहेत. त्या मूलरूपास सच्चिदानंद असें नांव आहे या मूलरूपापैकी सत् हे आपणांस प्रत्यक्ष सृष्टीच्या रूपाने नटलेले आढळते; चित् हे सृष्टपदाथोच्या ज्ञानाच्या रूपाने दिसते आणि प्रत्येक सजीव हृदयांत जे प्रेम अंशतः दिसते त्याची उत्पत्ति आनंदापासून झाली आहे. यासाठी खऱ्या प्रेमापासून दु:खाची उत्पत्ति संभवतच नाही. खरें प्रेम करणाऱ्याला अथवा ज्या वस्तूवर त्याच प्रम जडलं आहे त्या वस्तूला त्या प्रेमापासून दुःख होईल ही गोष्ट सर्वथैव अशक्य आहे. हे जर खरे तर प्रेम करणारा आणि त्याचा प्रेमविषय ही दोघेहि दु:खांत चूर झाल्याचे आपणांस हरघडी दिसते, हे कसे असा प्रश्न येथे उद्भवतो. याच्या उत्तरासाठी जगांत सर्वत्र आढळणारे असे एखादें उदाहरण आपण घेऊ. एका पुरुषाचे एका स्त्रीवर अत्यंत प्रेम असते; इतकें की ध्यानी, मनी, स्वप्नी तिच्या