पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

मुक्कामाची एक जागा आहे. यापूर्वी आपण अनेक ठिकाणी मुक्काम केला होता; व पुढेहि अनेक ठिकाणी मुक्काम करावयाचा आहे. 'ही सर्व सृष्टि आत्म्यामुळे उत्पन्न झाली आहे. सृष्टीपासून आत्मा उत्पन्न झाला नाही, हे सांख्यवचन नित्य लक्ष्यांत बाळगिले पाहिजे. जीवात्म्याच्या शिक्षणासाठी ही सारी सृष्टि दृश्य स्वरूपास आली आहे. त्याशिवाय तिचा दुसरा कोणताहि हेतु नाही. जीवात्म्याला ज्ञान होऊन त्या ज्ञानाच्यायोगें तो मुक्त व्हावा हाच सृष्टीचा उद्देश आहे. हा सृष्टिरूप ग्रंथ वाचून जीवात्म्याने ज्ञानी व्हावे व नंतर ग्रंथ टाकून द्यावा; परंतु तसे न करतां आली आपली स्थिति अगदी उलटी करून घेतली आहे. आह्मी स्वतःला स्वतंत्र न समजतां सृष्ट पदार्थापैकीच एक घटक आहों असें समजतो. जणूं काय देहाकरितां आत्म्याची योजना असून देहाचे संरक्षण करणे आणि त्याला सुखी ठेवणे हेच आत्म्याचे काम आहे ! एखाद्या खादाड मनुष्याची थट्टा करावयाची असली तर तो जगण्यासाठी खात नसून खाण्यासाठी जगतो अशा अर्थाच्या एका इंग्रजी ह्मणीचा उपयोग करतात; परंतु आपली सर्वांची नेहमींची वागणूक पाहिली तर ती वस्तुतः या खादाड मनुष्याच्या वागणुकीहून फारशी उच्च दर्जाची नसते. यामुळे आपल्या साऱ्या आयुष्याची आपण प्रत्यहीं थट्टा करून घेत आहों, हे आपल्या लक्षात येत नाही. आपण सृष्ट पदार्थापैकीच एक ही भावना पक्की करून घेतल्यामुळे सहोदरत्वाच्या नात्याने आह्मांस सृष्ट पदार्थाबद्दल लिप्तपणा वाढू लागतो व या लिप्तत्वाची मिठी एकवार आपणाभोंवतीं पडली की ती जीवात्म्यास पक्का बांधून गुलामाप्रमाणे राबविते. 'सदैव कर्म कर' या गीतेच्या अनुज्ञेप्रमाणे आह्मीं सदैव कर्म करीत असतों खरे, परंतु तें मालकासारखें कर्म नसून गुलामाचे कर्म आह्मी करीत असतो. यामुळे कर्मयोगाचे साध्य ह्मणजे मोक्ष यापासून आह्मी दिवसेंदिवस अधिकच लांब जातो.

तूम्ही स्वतंत्र होऊन कर्म करा हा कर्मयोगाचा मुख्य उपदेश आहे. एकसारखें कर्म करा परंतु त्या कर्माचे पर्यवसान मुक्तींत झाले पाहिजे, हे लक्ष्यांतून जाऊं देऊ नका. आपल्या भोंवतीं शेकडा नव्याण्णव लोक कार्यरत असल्याचे आपण पाहतो; परंतु ते कोणत्या प्रकारचे कर्म करितात याचा विचार केला तर स्वदेहसुखाच्या अभिलाषाचे बंदे गुलाम होऊन तो सांगेल तें काम हे लोक करीत असतात, असें आपणांस आढळून येईल. अशा प्रकारच्या गुलामगिरीमुळे जगांत जिकडे तिकडे रुदनस्वर ऐकू येतात. स्वदेह विसरून, त्याच्या सुखाभिलाषाची बुद्धि