पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

७७

भक्तियोगा येशू ख्रिस्ताला जी स्थिति प्राप्त झाली, तीच निवळ कर्मयोगानेहि एखाद्याला प्राप्त करून घेता येईल. बुद्ध ज्ञानी असून कर्मयोगी होता व येशुख्रिस्त शुद्ध भक्त होता; परंतु दोघांनाहि एकाच स्थितीची प्राप्ति झाली. ही स्थिति झणजे पूर्ण मुक्ताची स्थिति होय. मुक्तावस्था ह्मणजे काय, याचा येथे थोडासा खुलासा करणें अवश्य आहे. सुखदुःख, पापपुण्य, सत्कर्मदुष्कर्म, इत्यादि जी द्वंद्वे आपण नित्य पाहतो त्या द्वंद्वांतून पलीकडे गेलेला तो मुक्त. ज्याप्रमाणे दुःख, पाप आणि दुष्कर्म ही मुक्तीला विघातक आहेत त्याचप्रमाणे सुख, पुण्य आणि सत्कर्म ही सुद्धां खऱ्या मुक्तीच्या आड येणारी आहेत. एकाला लोखंडाच्या सांखळीने बांधिलें आणि दुसऱ्याला बांधावयास सुवर्णश्रृंखलेचा उपयोग केला तरी ज्याप्रमाणे त्यांच्या बंधनाचे स्वरूप वस्तुत: सारखेच आहे, त्याप्रमाणेच पुण्यकृत्ये करून सुख भोगणारा मनुष्य आणि दुष्कृत्य करून दु:ख भोगणारा मनुष्य हे दोघेही मुक्ताच्या दृष्टीने सारख्याच योग्यतेचे आहेत. आपल्या पायांत शिरलेला कांटा काढावयास जसा आपण दुसऱ्या कांट्याचा उपयोग करतों व काम झाल्यावर जसे ते दोन्ही कांटे टाकून देतो, तसेंच दुष्कर्माकडे वळलेले आपले मन त्यापासून परत फिरविण्याकरितांच सत्कर्माचा उपयोग आपणास करावयाचा आहे; तें एकवेळ पक्के परत फिरले ह्मणजे सत्कर्माचाहि आपणास काही उपयोग नाहीं; सत्कर्मापासूनहि आपलें मन आपणास पुढें आंवरावयाचे आहे. कोणतेंहि कर्म करण्याची आवश्यकता न वाटणे हीच अनासक्ति होय. कर्म करा; परंतु त्याचा विशेष असा कोणताच परिणाम मनावर होऊ देऊ नका. ज्याप्रमाणे एखाद्या तळ्याच्या पृष्ठभागावर तरंग येतात व जातात, परंतु त्यामुळे जसा त्या तळ्याच्या शांतीचा भंग होत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही कर्मे करूनहि आपल्या मनाचा क्षोभ होऊ देऊ नका असें भगवान् श्रीकृष्णांचे सांगणे आहे. हे शक्य तरी आहे काय ? आम्ही काही कर्म केले तर त्याचे काही सुखदु:ख आमच्या चित्तावर राहणारच, हा आमचा नित्याचा अनुभव आहे. असा अनुभव असतांहि आजच्या स्थितींत अशक्य वाटणारी गोष्ट शक्यकोटीत कशी आणतां येईल याचा आतां विचार करूं.

 माझ्या नित्यक्रमांत मला शेंकडों मनुष्ये रोज भेटतात आणि त्यांतच एखाद्यावर माझें प्रेम असते. रात्री मी बिछान्यावर पडलों आहे अशा वेळी दिवसा पाहिलेले सर्व चेहरे मी आठवू लागलो तर ज्यावर माझें प्रेम आहे त्या मनुष्या