पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

७५

हा भ्रम अंशतःहि जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत सुखदुःखाच्या द्वंद्वांतून आत्म्याची मुक्ति होणार नाही. यासाठी 'मी अमुक कर्म करतो आणि त्यापासून मला अमुक प्रकारची सुखप्राप्ति होईल' ही भावनाच टाकून द्यावी, असें भगवान् श्रीकृष्णांनी सांगितले आहे. प्राप्तकर्म केलेच पाहिजे असे आहे तर तें अवश्य करावें; परंतु त्यापासून सुखप्राप्ति होईल ही भावना सोडावी. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाच न ।' 'कर्म करावें परंतु त्यापासून अमुक फळ मिळेल अशी आसक्ति ठेवू नये ' असा याचा अर्थ आहे. आतां अनासक्ति ह्मणजे काय याचा आपण विचार करूं.

 अनासक्तीने प्रत्येक कर्म केले पाहिजे, हे भगवद्गीतेंतील एक मुख्य प्रतिपादन आहे. प्रत्येकाने कर्म हे केलेच पाहिजे, परंतु फलाची इच्छा न धरितां तें केलें पाहिजे. प्रत्येक प्राण्याला कोणत्या तरी प्रकारचे जन्मजात संस्कार असतात. मनाची तळ्याशी तुलना केली तर त्यांतील पाण्यावर जसे बारीक बारीक तरंग उठतात तसेच तरंग मनावर एकसारखे उठत असतात. मनाचे तरंग भासेनासे झाले तरी ते कधीहि समूळ नष्ट न होतां गुप्तरूपाने मनांत राहतात व कांहीं कारण घडल्याबरोबर पुन्हा त्यांचा उदय होतो; याच गुप्तरूपास संस्कार अशी संज्ञा आहे. आपण जी जी क्रिया करतों, अथवा जो जो विचार मनांत आणितों, त्या त्या प्रत्येकाचा ठसा मनावर उमटून, तो त्याच्या तळाशी बुडी मारून बसलेला असतो; व अशा गुप्त स्थितींतहि मनाला चलन देण्याची त्याची क्रिया चालू असते. आपण चालू व्यवहार करीत असतां आपलें में कांहीं स्वरूप प्रत्ययास येते, तें या अनेक प्रकारच्या संस्कारांच्या संघटनेने उत्पन्न झालेले असते. या स्वरूपाला नित्यव्यवहारांत आपण स्वभाव असें ह्मणतों.

 आतां मी स्वतः ज्या काही स्वरूपाने आपणांस दिसत असेन तें माझें स्वरूप पूर्वसंस्कारांच्या संघटनेपासूनच उत्पन्न झाले आहे. प्रत्येक मनुष्याच्या या स्वभावविशेषास दानत असें नांव आहे. पूर्वसंस्कार चांगले असले तर मनुष्य चांगल्या दानतीचा व वाईट संस्कारांनी वाईट दानतीचा होतो. एखादा मनुष्य नित्य वाईट शब्द ऐकत असला, मनांत नित्य वाईट विचार घोळवित असला, व नित्य वाईट कृति करित असला तर त्यापासून निघणारे संस्कारहि वाईटच असणार हे उघड आहे; व अशा संस्कारांनी तयार झालेली दानतहि वाईटच असली पाहिजे. एकाच प्रकारच्या संस्कारांची संवय एकवार मनास जडली ह्मणजे वाईटाचा वाईटपणाहि त्यास दिसेनासा होतो, व अशा मनुष्याच्या हातून