पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

७३

या जगांत आपण जें जें कांहीं करतो ते आपल्या चिच्छक्तीच्या बळावर करतो. या शक्तीवांचून नुसता देह ह्मणजे केवळ मातीचा गोळा आहे. याकरितां स्वतःच्या या शक्तीचे काय सामर्थ्य आहे याची पूर्ण जाणीव ज्याला उत्पन्न झाली आहे, असा मनुष्य कोणतेंहि कार्य नेटाने पार पाडण्यास लायक असतो. मग तें कार्य लौकिक असो अथवा वैयक्तिक असो, अगर दुसऱ्या कोणत्याहि प्रकारचे असो. ज्या मनुष्याला आपणांत सदैव वास करणाऱ्या या शक्तीची जाणीव झाली नाही तो संसार आणि परमार्थ या दोहोंतहि निरुपयोगी ठरतो. अध्यात्मज्ञानाच्या खालोखाल उपयोगी असें बौद्धिक ज्ञान होय. वस्त्रदान अथवा अन्नदान याहून बौद्धिकज्ञानदान फार श्रेष्ठ आहे. फार काय सांगावें, पण जीवदानापेक्षांहि ज्ञानदानाचे पुण्य अधिक आहे. कारण पुरुषार्थसंपादन ही जी मानवीजीविताची इतिकर्तव्यता तिची पूर्ति ज्ञानावांचून होणे नाही. ज्याने कोणताहि पुरुषार्थ संपादिला नाहीं तो जगला आणि मेला सारखाच. अज्ञान आणि त्यापासून उद्भवणारी दु:खपरंपरा यांच्या संगतीने कसेबसें आयुष्य ढकलणाऱ्या मनुष्याचें जीवित वस्तुतः कितीशा महत्वाचे आहे बरें ? या दोहोंच्या खालच्या पायरीची मदत ह्मणजे शारीरिक मदत होय. आपल्या अंगबळाने दुसऱ्यास मदत करावयाची व त्याच्या उपयोगी पडावयाचें हेंहि एक प्रकारचे दानच आहे. परक्यांचे दुःख निवारण करण्याकरितां केवळ शारीरिक मदत करणे ह्मणजेच त्याला खरी महत्वाची मदत केल्यासारखे होते असे समजू नये. वास्तविक शारीरिक मदत ही अगदी खालच्या पायरीची आहे; कारण तीपासून होणारा उपयोग केवळ तात्कालिक असतो. त्याला कोणतेंहि चिरकालिक स्वरूप नसते. भुकेच्या वेळी कोणाला अन्न दिले तर त्यावेळेपुरता त्याला आनंद होईल हे खरें, पण पुन्हां लवकरच भूक आणि दुःख ही परत येणार. हीच गोष्ट आपल्या इतर गरजांसहि लागू पडते. जेथें कसली तरी गरज उत्पन्न झाली तेथें तिच्या पाठोपाठ तिचें लेकरूं दु:ख हे ठेवलेलेच असते. जर मला खरोखर सुखी व्हावयाचे असेल तर गरजेच्या पलीकडे मला गेले पाहिजे. ज्या दिवशी मला कशाचीहि गरज लागणे नाहीसे होईल त्या दिवशी मी खरा सुखी होईन. अशा स्थितीत मला भुकेची बाधा होणार नाही व जगांतील कोणतीहि स्थिति मला माझ्या पदापासून ढळवू शकणार नाही. अशा प्रकारची स्थिति प्राप्त होण्याजोगी मदत मला मिळाली तर ती अत्यंत श्रेष्ठ प्रकारची मदत होय. तिच्या खालोखाल बौद्धिक आणि अगदी शेवटच्या पायरीची ह्मणजे शारीरिक मदत होय.