पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


लाहि लाजविणारी स्त्री ही उपेक्ष्य मानण्याची तुझी तयारी असली पाहिजे. परहितासाठी देहाचीहि आहुती देण्याची गृहस्थाची तयारी असली पाहिजे. ज्याला संन्यासी व्हावयाचे असेल त्याने रूपवती स्त्री, पैसा आणि सत्ता यांकडे ढुंकूनहि पाहूं नये. जो तो आपपल्यापरी मोठाच आहे. ज्याचें जें कर्तव्य तें त्याने करावें. “ स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ।" हेच खरें धर्मरहस्य.

प्रकरण ३ रें.
कर्मरहस्य.

 दुसऱ्याच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण अंगमेहनत करणे हे खरोखर थोरवीचे लक्षण आहे; परंतु परक्याची अडचण ज्या मानाने अधिक महत्वाची असेल, व ज्या मानाने मदतीचे परिणाम अधिक काल टिकणारे असतील त्या मानाने मदत करणाराची थोरवीहि अधिक होईल हे उघड आहे. आपण एखाद्याची एखाद्या घटकेपुरती अडचण निवारण केली तर आपण त्यास मदत केली हे कृत्य चांगले तर खरेंच; परंतु जर आपण एक वर्षापुरती त्याला मदत केली तर त्या मानाने आपल्या मदतीचे श्रेयहि अधिक झाले हे उघडच आहे. त्याचप्रमाणे जर आपण त्याची एखादी चिरकालिक अडचण दूर केली, तर खरोखर त्या मदतीचे मापहि करता येणार नाहीं ! आपलें अनंत कालाचें दुःख सर्वथैव नष्ट करण्याचे सामर्थ्य एकट्या अध्यात्मविदयेतच आहे. याच साठी ' अध्यात्मविद्या विद्यानाम् ' असें ह्मणून भगवान् श्रीकृष्णांनी त्या विद्येला प्रत्यक्ष परमेश्वराच्या पायरीस पोहोंचविले आहे. दुसऱ्या कोणत्याहि विद्येचे सामर्थ्य कांहीं थोड्याशा कालापलीकडे जात नाही. मनुष्यदेहांत सदैव वास करणाऱ्या इच्छा व आशा व त्यांमुळे उद्भवणारी अतृप्ति यांचा समूळ नाश करून त्याला स्वानंदसाम्राज्यपदी आरूढ करणे हे सामर्थ्य एकट्या अध्यात्मविद्येचंच आहे. असें आहे तर अध्यात्मज्ञानदाना इतके मोठे पुण्यकृत्य दुसरं कोणतें असणार आहे ? ' य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति । भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥'

 अशी अध्यात्मज्ञानदानाची थोरवी भगवंतांनी स्वतः वर्णिली आहे ! परमार्थमार्ग दाखविणारे महात्मे हेच मानवजातीचे खरे हितचिंतक होत. अशा महात्म्यांच्या ठिकाणी अनुपमेय सामर्थ्य वास करित असल्याचे आपणास आढळून येते.