पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

७१

काळोख होऊ लागल्यामुळे मागे फिरणेहि सुरक्षित नाही. या शेजारच्या मोठ्या वृक्षाखाली एक रात्र काढून सकाळीच आपण मागे फिरूं.” राजकन्येला त्या दोघांचे हे ह्मणणे बरोबर वाटले व ती तिघे त्या वृक्षाच्या आश्रयास येऊन बसली.

 त्या वृक्षावरील एका कोटरांत एका लहान पक्ष्यांचे घरटे होते. त्यांत तो पक्षी, त्याची मादी व तीन लहान पिलें असें कुटुंब होतें. नरानें घरट्यांतून सहज बाहेर डोकावून पाहिले तो त्यास हे तीन अतिथी आढळले. तेव्हां तो गृहस्थाश्रमी पक्षी आपल्या पत्नीस ह्मणाला, “प्रिये, आपल्याकडे तीन अतिथी आल्याचे दिसते. थंडी तर मी ह्मणते! आणि आपल्या घरांत विस्तव नाही!" असें ह्मणून तो पक्षी बाहेर उडून गेला व एक जळत्या लांकडाचा तुकडा चोंचींतून आणून त्याने त्या तिघांपुढे टाकला. तो घेऊन व जवळ पडलेला पाचोरा त्यावर घालून त्यांनी शेकोटी तयार केली. परंतु त्या पक्ष्याचे येवढयाने समाधान झाले नाही. तो पुन्हां ह्मणाला, “हे तर बिचारे उपवासी दिसतात ! यांस खावयास देण्यासारखें आपल्या घरांत काही नाही. प्रिये, आपण गृहस्थाश्रमी आहों आणि क्षुधात अतिथि आला असतां त्याला विमुख परत लावणे आपला धर्म नव्हे. आपणाजवळ जें कांही असेल तें त्यास द्यावे. माझ्याजवळ माझा देह मात्र आहे. तोच मी त्यांस अर्पण करतो." असें ह्मणून त्याने त्या पेटलेल्या आगीत उडी घेतली. हे पाहून त्याची ती स्त्री विचार करू लागली की, “एवढासा लहान पक्षी खाऊन त्या तिघांची तृप्ति कशी होईल? माझ्या पतीच्या मार्गाने जाऊन त्यांची तृप्ति करणे माझें कर्तव्य आहे." असें ह्मणून तिनेंहि त्या आगीत उडी टाकिली. हे सर्व कृत्य ती पक्ष्याची तीन पिलें पाहत होती. तीही आपल्या मनाशी विचार करूं लागली की, “अजूनहि या आपल्या पाहुण्यांची तृप्ति होईलसें वाटत नाही. आईबापांच्या मागे त्यांची तरतूद ठेवण्याचे काम आमच्याकडे आले आहे." असें ह्मणून त्या तीघांनीही आगीत उडी घेतली.

 हे सर्व कृत्य पाहून ती तिघेहि थक्क होऊन गेली. दिवस उगवल्यानंतर ती सर्व अरण्याच्या बाहेर आली. राजा व संन्यासी यांनी राजकन्येला तिच्या बापाकडे पोहोंचविलें. नंतर संन्यासी राजाला ह्मणाला, “ राजा आपले कर्तव्य करणारा कोणत्याहि परिस्थितीत असला तरी तो मोठाच समजावा. जर गृहस्थाश्रमधर्म स्वीकारण्याची तुझी इच्छा असेल तर त्या पक्ष्याप्रमाणे परहितासाठी आपल्या देहावरहि पाणी सोडण्यास तुला तयार असले पाहिजे. तसेंच संन्यस्त व्हावें असें तुला वाटत असेल तर त्या संन्याशाप्रमाणे राज्यलक्ष्मी आणि रती-